वंदना बर्वे
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी केला आहे. एका वृत्तपत्र समूहाद्वारे आयोजित ‘उत्तराखंडच्या विकासाचा रोडमॅप’ या विषयावरील कार्यक्रमात बोलत असताना संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्याच्या विकासासोबतच देशाची प्रगती आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतील चित्र यावर विस्तृत मत मांडले.
अजय भट्ट म्हणाले की, भाजपला २०२४ मध्ये ४०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळेल. देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडतात. देशाचा विकास जर कोणी करू शकत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत हे लोकांना माहीत आहे. यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधानपद सांभाळतील यात किंचितही दुमत नाही.
उत्तराखंडच्या विकासाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, डलब इंजिनच्या सरकारमुळे उत्तराखंडचा विकास खूप वेगाने होत आहे. युवा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे उत्तम काम करत आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त काम करीत आहेत. तरुण रक्त आहे. ते वाट चुकणार की काय? अशी भीती आम्हाला आधी वाटत होती. परंतु ते चांगले काम करत आहे. दुसरे मजबूत इंजिन पीएम मोदी आहे. केंद्र सरकारने उत्तराखंडच्या प्रत्येक प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि निधी दिला आहे. डबल इंजिनच्या सरकारचे हे यश होय.
(हेही वाचा – सुप्रिया सुळे मुख्यमंत्री अन् आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री, मविआचा होता प्लॅन; म्हणून शिवसेना फुटल्याचा भाजप नेत्याचा दावा)
भट्ट पुढे म्हणाले की, एकेकाळी जेव्हा आमचे नेते परदेशात जायचे तेव्हा त्या देशाचे प्रमुख आपल्याकडे तुच्छपणाने बघायचे. दोन दोन दिवस भेट देत नव्हते. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. तेच लोकं आता आपल्या माननीय पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उत्सुक दिसतात. कुणी म्हणतं मोदीजींचा ऑटोग्राफ घ्यावा. कुणी म्हणतं मोदीजी बॉस आहेत. कोणीतरी त्याच्या पायाला स्पर्श करतो. आपण सर्व हे आपल्या डोळ्याने पाहत आहोत.
आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया यांसारख्या योजनांमुळे पुढील २५ वर्षांत संरक्षण उत्पादने बाहेरून खरेदी करण्याची गरज भासणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. ते म्हणाले, आज आपण पूर्णपणे स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. पूर्वी आम्ही इतर देशांत जायचो, त्यांच्याकडे मदत मागायचो. यापूर्वी बुलेट प्रुफ जॅकेटही आयात केले जात होते.
१९६२ चे युद्ध आपण पाहिले आहे. आमची सेना तुटलेल्या बुटात कशी लढली. तेव्हाची परिस्थिती आज पूर्णपणे उलटली आहे. आज आपण पूर्णपणे स्वावलंबी झालो आहोत. मॉर्गन स्टॅन्लेने अहवाल दिला. पूर्वी आपली अर्थव्यवस्था खाली होती, मॉर्गन स्टॅनली अहवाल दाखवतो की आपण पूर्वीपेक्षा किती मजबूत झालो आहोत. आयएमएफनेही भारताचे कौतुक केले. पूर्वी इंग्रज आमची चेष्टा करायचे. त्यांना स्वातंत्र्य द्यायला नको होते, असे म्हणायचे. पूर्वी आपण जगात दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होतो, आज पाचव्या क्रमांकावर आहोत. येत्या काही दिवसात आपण प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर पोहोचणार आहोत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community