मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिला आहे. राज ठाकरे हनुमान जयंतीच्या निमित्ताने पुण्यात दाखल झाले आहेत. तिथे महाआरती होणार आहे, त्याला उत्तर म्हणून राष्ट्रवादीकडून पुण्यातील साखळीपीर हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात हिंदूंमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर आणि भाई कात्रे यांनी या रोजा इफ्तारचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यासोबतच राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिक्षण महर्षी पी ए इनामदार, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस आयुक्त प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोयेकर देखील उपस्थित असणार आहे. साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिराच्या विश्वस्तांमार्फत मागील ३५ वर्षांपासून मुस्लिमांसाठी रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदादेखील हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला रोजा इफ्तार कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध पदार्थ ठेवले जाणार आहेत.
(हेही वाचा पोस्टरवर राज ठाकरेंचा ‘हिंदुजननायक’ असा उल्लेख!)
३५ वर्षांपासून इफ्तार पार्टीचे आयोजन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेला उत्तर देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे का? असे विचारण्यात आले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र माळवदकर यांनी सांगितले की, आम्ही हा उपक्रम काल आयोजित केलेला नाही. हा उपक्रम मागील ३५ वर्षांपासून आम्ही आयोजित करत असून यामध्ये समाजातील प्रत्येक घटक सहभागी होत असतो. इथे येऊन नतमस्तक होतो. यातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते, असे माळवदकर म्हणाले.
दुधाने लॉन्सकडेही आरती आणि इफ्तार पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यातील कोथरुड भागातील दुधाने लॉन्स या ठिकाणी दिवसभर पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या आढावा बैठका होणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सकाळी दहा वाजल्यापासून दिवसभर या बैठकांना उपस्थितीत राहणार आहेत, तर दुपारच्या सत्रात अजित पवार आणि सुप्रिया सुळे या देखील या बैठकांना उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर संध्याकाळी पावणे सात वाजता राष्ट्रवादीच्या पुणे शहर आघाडीकडून दुधाने लॉन्सच्या समोर असलेल्या हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त आरतीचे आणि तिथेच रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी जयंत पाटील यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे आणि जयंत पाटील यांनी ती मान्य केली आहे. तर उद्या संध्याकाळी सहा वाजता पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदिरात राज ठाकरेंच्या उपस्थितीत आरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आल्यानंतर लगेच राष्ट्रवादीकडून दुधाने लॉन्सच्या समोर असलेल्या हनुमान मंदिरात आरती आणि तिथेच रोजा इफ्तारचे एकत्रित आयोजन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community