अमित शहा घेणार लालबागच्या राजाचे दर्शन, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आखणार रणनीती

139

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला खिंडार पडले आहे. त्यामुळे गेल्या 25 वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेला येत्या महापालिके निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पण आता याच पार्श्वभूमीवर राज्यात सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपने देखील महापालिका निवडणुकांसाठी तयारी केली असून वरिष्ठ नेत्यांनी देखील यासाठी रणनीती आखायला सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील येत्या 5 सप्टेंबरला मुंबई दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांची घेणार भेट

2017 च्या महापालिका निवडणुकीत अवघ्या काही जागांमुळे भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले होते. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजप जोरदार प्रयत्न करणार आहे. यासाठी भाजपचे चाणक्य म्हणून ओळख असलेले अमित शहा हे अॅक्शन मोडमध्ये आले असून, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे कळते. तसेच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेऊन महापालिका निवडणुकांसाठी रणनीती आखणार असल्याचे कळते.

लालबागच्या राजाचे घेणार दर्शन

या दौ-यादरम्यान अमित शहा हे मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेणार असून, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांच्या घरच्या बाप्पाचे देखील दर्शन घेणार आहेत. अमित शहा यांचा हा दौरा भाजपच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात असून, त्यांच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे देखील मुंबई दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.