BJP : पुढील 30 वर्षे केंद्रात भाजपची सत्ता हवी; जोमाने कामाला लागा; अमित शहा यांचे आवाहन

202

भारतीय जनता पक्षाला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आव्हान गृहमंत्री अमित शहा यांनी केले. मात्र पुढील 30 वर्षे केंद्रात भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता असावी यासाठी प्रत्येकाने सक्रिय योगदान देण्यास सज्ज असावे, असे स्पष्ट मत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोर शहा यांनी व्यक्त केले.

भाजप (BJP) मुख्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.या बैठकीत अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकून आणण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपने लोकसभेच्या 400 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. पुढील 30 वर्षे केंद्रात भाजपची सत्ता राहील यासाठी प्रयत्न करा. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळा देशभर उत्साहाने साजरा केला जाईल याची काळजी घ्या. केंद्रीय योजनांचा विस्तार करा. तसेच महिला बचत गट, बुथ स्तरावर अधिक लक्ष केंद्रीत करून मतदारांना भाजपकडे (BJP) खेचण्याचा प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा Ayodhya Ram Mandir : १५२८ ते २०२४ अयोध्या श्रीराम मंदिराचा ५०० वर्षांचा संघर्ष)

भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागा जिंकण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. यासाठी भाजपने (BJP) देशभरातील 543 जागांसाठी क्लस्टर रणनीती तयार केली आहे. त्यात महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 12 क्लस्टर तयार करण्यात आले असून, एका क्लस्टर प्रमुखावर 4 मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रकरणी भाजप नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा व अमित शहा यांच्या नेतृत्वात मंगळवारी रात्री दिल्लीत भाजपच्या (BJP) प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, राम सातपुते, अतुल सावे, हर्षवर्धन पाटील, रवींद्र चव्हाण या महाराष्ट्रातील नेत्यांची उपस्थिती होती. या नेत्यांच्या उपस्थितीत या बैठकीत महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील व्युहरचना आखण्यात आली. भाजपने लोकसभेच्या देशभरातील 543 जागांसाठी 156 क्लस्टर प्रमुख नियुक्त केलेत. या प्रमुखांकडून या बैठकीत त्यांच्या मतदार संघांतील स्थितीचा आढावा घेण्यात आला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.