आपल्या सहाच्या सहा जागा भाजपच्या आल्या पाहिजेत. आपल्याला जो वेळ लागेल, आपल्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला यावे लागेल, आम्ही उपलब्ध राहू. तुम्ही सांगाल ते काम करू. पण ‘अभी नही तो कभी नही,’ अशा इर्षेने आपला भाजपचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकवायचा आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शनिवारी भाजपतर्फे चेंबूर येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी आवाहन केले. आमदार प्रसाद लाड यांच्या आमदार निधीतून चेंबूर विधानसभा क्षेत्रातील घाटले व्हिलेज रस्ता दुरुस्तीकरण, सुभाषनगर बिल्डिंग नं. ८ व १२ च्या पॅसेजचे कॉंक्रीटीकरण, सांडुवाडी येथे साईमंदिराची शेड नूतनीकरण व विजयनगर येथील नवजीवन सोसायटीत लादीकरण अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळेस तेथील जनतेशी संवाद साधताना दरेकर बोलत होते.
भगव्याचे रक्षण करत भाजपचा भगवा पालिकेवर फडकवू या
ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दोन – तीन दिवसांपूर्वी सांगितले होते की, या झेंड्याचे, भगव्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. कारण भगवा हे हिंदुत्वाचे प्रतीक आहे, त्यागाचे प्रतीक आहे. ज्यांनी भगवा खांद्यावर घेतला आहे, ते भागव्याचे रक्षण करू शकत नाहीत. कारण त्यांनी आता कॉँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर संगत केली आहे. त्यामुळे भगवा आपला आहे. भगवा हिंदुत्वाचा आहे. त्या भगव्याचे रक्षण करत आपणच आपला भाजपचा भगवा महापालिकेवर फडकवू या. त्यासाठी आपण सारे जण एकत्रितपणे कामाला लागू या. मुंबईकर निश्चितपणे आपल्या पाठीशी आशीर्वाद उभा करतील. घाटले ग्राम आगरी समाजाच्या मागणीवरून या ठिकाणची मागणी मान्य झालीय. मी सर्व समाजाला, संस्थांना आवाहन करतो की, आता भाजपच्या मागे आपले आशीर्वाद द्या. आपल्याला अपेक्षित सेवाकार्य आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी करतील आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी पुनः एकदा वैभवाने आम्ही सुंदर, स्वच्छ करू, असा विश्वास देतो. आज पवित्र दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. आणि या पुण्यतिथीचे औचित्य साधून आपण हा कार्यक्रम घेतला, मी सावरकरांच्या चरणी नतमस्तक होतो, असेही दरेकर म्हणाले.
…तर यापेक्षा दुर्दैव ते काय?
दरेकर पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे बोलणे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलल्याशिवाय पूर्णच होत नाही. मुख्यमंत्री म्हणाले, देवेंद्रजींनी मी पुनः येईन म्हटले. आणि काय झाले. पुनः येईन असे म्हणून न आलेले वाईट. म्हणून मी न सांगता आलो. गंमत केली. राज्याचा मुख्यमंत्री त्या पदावर आल्यानंतर जर बोलत असेल, मी गमतीने या राज्याचा मुख्यमंत्री झालो, तर यापेक्षा दुर्दैव ते काय? दोन – अडीच वर्षे या राज्याची गंमतच चललीय, असा टोलाही दरेकर यांनी हाणला. कोरोनाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे रस्त्यावर काम दिसत नव्हते. ज्या वेळेला निधी आला, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर होते अशा वेळेला सरकार घरात होते. त्यामुळे राज्य सरकारचा कारभार चालवणे ही तुम्हाला गंमत वाटत असेल तर येणाऱ्या काळामध्ये ही गंमत आहे की काय, आहे हे समजेल.
चेंबूर विधानसभेत भाजपचा भगवा झेंडा फडकेल
राज्यकारभार गांभीर्याने चालवायचा असतो. संवेदनशीलतेने चालवायचा असतो. हे जनता दाखवून देईल. आज अनेक कार्यक्रमांचे भूमिपूजन झाले आहे. यासाठी दरेकर यांनी आमदार प्रसाद लाड, नगरसेविका आशा मराठे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. येणाऱ्या काळात मुंबईकर आपल्यासोबत आहेत. चेंबूरकर आपल्यासोबत १०० टक्के आहेत. चेंबूर विधानसभेतील सहाही प्रभागांवर भाजपचा भगवा झेंडा फडकेल. तसेच मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा झेंडा फडकेल, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – …तेवढा महाराष्ट्र एकवटणार, आदित्य ठाकरेंचा भाजपावर निशाणा!)
शिवसेनेने कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आपला हिंदुत्वाचा विचार बासनात गुंडाळलाय. तो आपल्याला पुढे न्यायचे काम करायचे आहे. म्हणून येणाऱ्या महापालिकेवर आपला भाजपचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आपण कार्यकर्ते सज्ज राहा. सुभाषनगरमधील जनता आपल्याला आशीर्वाद देईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे दरेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार प्रसाद लाड, मंडळ अध्यक्ष राहुल वाळंज, अनिल ठाकूर, नगरसेविका आशा मराठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.