महामंडळ वाटपाचे सूत्र ठरले?; यांना मिळणार संधी

140

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबत चालल्याने एकीकडे आमदारांच्या गोटात अस्वस्थता वाढत असताना, आता महामंडळ वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाआधी त्याची घोषणा केली जाईल. दोन्ही पक्षांत ६०-४० असा फॉर्मुला ठरल्याची माहिती ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या हाती लागली आहे.

( हेही वाचा : मुंबईतील सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी )

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाकडून ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी अनेकजण नाराज झाल्याने पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात सामावून घेण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र, इच्छुकांची संख्या अधिक आणि पदे कमी असल्याने शिंदेंसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी आमदारांची नाराजी पुन्हा उफाळून येऊ नये, यासाठी आमदारांना पुन्हा गुवाहाटीला नेण्यात आले. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांचा समावेश करणे शक्य नाही, त्यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक चर्चा करून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. काहींना चांगल्या महामंडळाचे आश्वासन, तर काहींना संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी देण्याचे यावेळी ठरवण्यात आले.

राज्यात एकूण १२० महामंडळे आहेत. त्यापैकी ६० महामंडळे ‘मलईदार’ मानली जातात. पहिल्या टप्प्यात या ६० महामंडळांचे वाटप केले जाणार आहे. त्यापैकी ६० टक्के म्हणजे ३६ भाजपाला, तर २४ महामंडळे शिंदे गटाला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळ विस्ताराआधी महामंडळांचे वाटप केले जाईल. दोन टर्म किंवा त्याहून अधिक काळ निवडून आलेले आमदार, ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश करता येणार नाही, अशांना महामंडळ वाटपात प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते.

यांची नावे चर्चेत

अनिल बाबर, शहाजी पाटील, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, ज्ञानराज चौगुले, प्रा. रमेश बोरनारे, प्रदीप जयस्वाल, संजय रायमुलकर, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, किशोरअप्पा पाटील, सुहास कांदे, चिमणआबा पाटील, किशोर जोरगेवार, मंजुळा गावित यांची नावे महामंडळांसाठी चर्चेत आहेत. भाजपाकडून कोणाला संधी मिळणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.