शिवसेनेची पोलखोल करत मुंबईत धावणार भाजपचा रथ

213

गेल्या २५ वर्षांत सत्ताधारी शिवसेनेने महानगरपालिकेत विविध मार्गांनी भ्रष्टाचार करत मुंबईकरांना लुटण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप भाजपच्यावतीने होत आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने आता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा पोलखोलच्या माध्यमातून भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरु असून मुंबईतील प्रत्येक प्रभागांमध्ये पोलखोल सभा आयोजित करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ रविवारी गोरेगाव येथील सभेद्वारे झाला आहे. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक भागात भाजपचा पोलखोल रथ धावणार असून सत्ताधारी शिवसेनेला कशाप्रकारे रोखण्याचा प्रयत्न करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

( हेही वाचा : गिरगावच्या ‘त्या’ प्रेक्षक गॅलरीचे रश्मी ठाकरे यांच्या हस्ते का झाले उदघाटन? )

हा झंझावात मुंबईकरांच्या न्यायासाठी सुरु

मुंबई-गोरेगाव विधानसभेत वॉर्ड क्रमांक ५८ (प. सिद्धार्थ नगर रस्ता क्रमांक ११, प्रबोधन क्रीडा भवनाजवळ, तातू हॉटेलच्या बाजूला, गोरेगाव (प.) येथे शक्ति प्रदर्शन करत भाजपाने पोलखोल सभेचे रविवारी आयोजन केले होते. आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ‘पोलखोल’ अभियानाद्वारे सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार असल्याचा इशारा मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दिला. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पोलखोल रथाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलतांना महानगरपालिका निवडणूक समितीचे अध्यक्ष व आमदार अँड. आशिष शेलार यांनी, मुंबईकरांकडून करापोटी जमा झालेल्या पैशाची लूट करणाऱ्या सत्ताधीशांच्या भ्रष्टाचाराची ‘पोलखोल’ भाजपाने सुरु केली असल्याचे सांगितले. ज्या पत्रा चाळीतील मध्यमवर्गीय मुंबईकरांच्या घरांवर सत्ताधाऱ्यांनी डल्ला मारला तिथेच पोलखोलचा नारळ आम्ही फोडला असून हा झंझावात मुंबईकरांच्या न्यायासाठी सुरु असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला सुरुंग लावणार

शिवसेनेनेच्या भ्रष्टाचाराची नाळ जिथे पुरली आहे, जिथून मराठी माणसाला उध्वस्त करण्यात आलं, त्या पत्राचाळीतून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला सुरुंग लावणार असा इशारा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार विद्या ठाकूर, आमदार, अमित साटम, आमदार मनीषा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर व माजी नगरसेवक संदीप पटेल यांनी या सभेचे आयोजन केले होते. यावेळी भाजपा पदाधिकारी, गोरेगावातील माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.