Hindu मतांसाठी भाजपा मुंबईतील ३६ मतदारसंघांत करणार चाचपणी

116
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात सत्ता आणण्यासाठी मुंबईतील ३६ मतदारसंघ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने प्रत्येक मतदारसंघात तळागाळात फिरून भाजपा स्वतंत्र अहवाल तयार करणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. या अहवालाच्या आधारे कोणाला परत संधी द्यायची आणि कोणत्या मतदारसंघात नवा चेहरा द्यायचा, हे ठरवले जाणार आहे. विशेष म्हणजे एकगठ्ठा मुस्लिम मतदारांवर जालीम उपाय म्हणून मुंबईतील ३६ मतदारसंघांतील सर्व हिंदू (Hindu) मतदार कसा एकत्रित मतदानासाठी रस्त्यावर उतरवता येईल यादृष्टीनेही या अहवालाच्या माध्यमातून विशेष रणनीती आखली जाणार असल्याचे समजते.
आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मुंबईसाठी विशेष नियोजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे या दृष्टीने मुंबईकडे विशेष लक्ष देणार आहेत. मुंबईच्या ३६ विधानसभा मतदारसंघासाठी बैठका घेऊन भाजपाकडून विशेष रणनीती ठरवण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळालेले मतदारसंघ आणि मताधिक्य न मिळालेले मतदारसंघ अशी वर्गवारी करून त्यादृष्टीने रणनीती ठरवली जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपाचे पदाधिकारी एकत्रित मिळून मुंबईतील प्रत्यके विधानसभा मतदारसंघाचा एक स्वतंत्र अहवाल तयार करणार आहेत. मतदारसंघातील सध्याच्या भाजपाच्या विद्यमान आमदाराची किती लोकप्रियता आहे, मतदारसंघातील विकासकामांची काय परिस्थिती आहे, प्रतिस्पर्धी उमेदवाराला हरविण्यासाठी मतदारसंघातील कोणते मुद्दे परिणामकारक ठरतील, याबाबतची इत्थंभूत माहिती या अहवालात असेल. अहवाल तयार केल्यानंतर मुंबईत कुणाला परत संधी द्यायची; तसेच कुठे नवा चेहरा द्यायचा हे ठरवले जाणार असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीत मुंबईतील काही मतदारसंघांत मुस्लिम मतांचा सर्वाधिक फटका बसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त हिंदू मतदारांपर्यंत पोहोचून जनजागृती करण्यावर भाजपाकडून भर देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात कानाकोपऱ्यात फिरून माहिती गोळा केली जाईल. मतदारसंघातील झोपडपट्ट्या, चाळी, छोट्या सोसायट्या; तसेच गगनचुंबी इमारती अशी वगवारी करून तिथल्या मतदारांची माहिती गोळा केली जाणार अल्याचे समजते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.