भाजपाची एसटी आंदोलनातून माघार, कामगार मात्र संपावर ठाम!

राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना आझाद मैदानात घेऊन आंदोलन करणारे भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी, २५ नोव्हेंबर रोजी आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली. एसटी कामगारांच्या आंदोलनाचे केवळ आझाद मैदानापुरते भाजप नेतृत्व करत होते, म्हणून या ठिकाणाहून भाजप आंदोलन मागे घेत असल्याचे घोषित करत आहे, त्याउपर जर राज्यातील इतरत्र भागात कामगारांना आंदोलन सुरू ठेवायचे असेल, तर त्याचा निर्णय कामगारांनी घ्यावा, आमचा त्यांना नैतिक पाठिंबा असेल, असे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. मात्र संपावर गेलेल्या कामगारांनी संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे.

सरकारच्या पगारवाढीच्या निर्णयाचे स्वागत!

एसटीच्या विलीनीकरणाचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर निर्णय होणार आहे. आमचा एसटीच्या कामगारांना पाठिंबा आहे. हे आंदोलन एसटीच्या कामगारांनी राज्यभर सुरु केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला होता आणि त्यांना घेऊन आम्ही आझाद मैदानात आणले होते. मात्र बुधवारी राज्य सरकारने कामगारांना कधी नव्हे इतकी पगारवाढ दिली आहे, हा लढ्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, हा पहिला विजय आहे. आता विलीनीकरणाचा मुद्दा न्यायालयीन पातळीवर सुरु आहे. त्यासाठीही भाजपचा पाठींबा असणार आहे. हे आंदोलन पुढे सुरूच ठेवायचे का, यावर आता कामगार संघटनांनी घ्यावा, असे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले.

…तर जनतेचे नुकसान होईल 

तर आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, विलीनीकरणाचा मुद्दा हा न्यायालयात आहे. न्यायालयात पुढील तारीख २० डिसेंबर रोजी आहे, तेव्हाही जर न्यायालयाची तारीख पुढे ढकलली, तर हा प्रश्न प्रलंबित राहील. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे नुकसान होणार आहे. म्हणून भाजपने या आंदोलनातून तूर्तास माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण कामगारांच्या पुढील निर्णयाला भाजपचा पाठींबा आहे, असे पडळकर म्हणाले .

कामगारांची फसवणूक! 

संपाची हाक सदाभाऊ खोत, पडळकर यांनी दिली नव्हती तर एसटी कामगार चतुर्थ श्रेणी संयुक्त कृती समितीने दिली होती, तशी नोटीस समितीने दिली होती. त्यामुळे सरकारने समितीच्या नेत्यांशी चर्चा केलीच नाही. बुधवारी जी सरकारने पगारवाढ दिली आहे, ती फसवणूक आहे. कारण आधीच महामंडळाचे वेतन वाढीचे ३ करार प्रलंबित होते. त्या तुलनेत आमचे आताचे वेतन सध्या वाढवून दिलेल्या वेतनापेक्षा किती तरी जास्त असायला पाहिजे होते. त्यामुळे आम्ही संप मागे घेणार नाही, संप सुरूच राहणार, पडळकर-खोत हे राजकीय पक्षाचे नेते आहेत, त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे, आम्ही मात्र विलीकरणाच्या मागणीवर कायम आहे, अशी भूमिका एसटी कामगार संघटनांनी मांडली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here