पेगॅसेस प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपाच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयासमोर निदर्शने केली. त्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विरोध केला. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. याप्रसंगी भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक बनले होते. परिणामी पोलिसांनी काँग्रेसला आंदोलन गुंडाळण्यास भाग पाडले.
भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसचे आंदोलन गुंडाळले
मोदी सरकार पेगॅसेसच्या माध्यमातून राजकीय पक्षाचे नेते, पत्रकार यांची हेरगिरी करत होते, असा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट भाजपचे दादर येथील वसंत स्मृती कार्यालय गाठले, त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरु केली. त्यावेळी भाजपचेही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले आणि काँग्रेसच्या आंदोलनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. जर काँग्रेसला काही आक्षेप आहे, तर त्यांनी चर्चेद्वारे मुद्दा मांडावा, अशा प्रकारे भाजपच्या कार्यालयावर कुणी चालून येणार असेल तर मान्य केले जाणार नाही, आम्ही त्याचा विरोध करू, असे भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगल प्रभात लोढा म्हणाले. तसेच भाजप नेते प्रसाद लाड यांनी जोवर काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली जाणार नाही, तोवर आमचे आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांनी अखेर काँग्रेसचे आंदोलन ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरु होते, ते झिशान सिद्दीकी यांना ताब्यात घेतल्याने काँग्रेसने आंदोलन मागे घेतले.
Join Our WhatsApp Community