ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला पूर्णविराम लागला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकएक अनपेक्षित घटना घडत होत्या. राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्य शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीने संपले. यानंतर आता शिंदेंच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. या मंत्रिमंडळात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव देखील आघाडीवर असल्याचे कळत आहे.
अशातच गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर पडळकरांच्या मंत्रीपदासाठी कार्यकर्त्यांनीही कंबर कसली आहे. गोपीचंद पडळकरांना मंत्री करा, अशा मागणीसाठी कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री पदासाठी लॉबिंग देखील सुरू झाल्याच्या पाहायला मिळत आहे. दरम्यान, जत तालुक्यातील पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी एक रक्ताचे पत्र लिहून गोपीचंद पडळकरांना कॅबिनेट मंत्री करण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचा – मंत्रालयात सत्यनारायणाच्या पुजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पदभार, CMO मध्ये सजावट )
कसं आहे पत्र
जत तालुक्यातील भाजप विद्यार्थी आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष पिरू कोळी आणि युवा नेते अनिल पाटील यांनी मंत्रिमंडळात आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्री पद मिळावे, यासाठी थेट स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. हे रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. सध्या राज्यात या पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता पडळकरांची मंत्रिमंडळात वर्णी लागते का, याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Join Our WhatsApp Community