भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी, नोव्हेंबर रोजी दादर येथे युवा मोर्चाचा भव्य कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये पार पडला. युवा मोर्चाच्या या कार्यक्रमासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात जोरदार बॅनरबाजी केली. संपूर्ण शिवाजी महाराज पार्कचा परिसर भाजपच्या जाहिरातबाजीने झाकून टाकला होता. त्यामुळे मनसेच्या विद्युत रोषणाईने शिवाजी पार्क परिसराच्या सजलेल्या साजश्रृंगारावर भाजपने बॅनरबाजी करत हा परिसरच विद्रुप करून टाकल्याने महापालिका करते काय, असा सवाल उपस्थित झाला होता. संपूर्ण परिरसरात या कार्यक्रमाची जोरदार जाहिरातबाजी दिसून आली असली तरी या बॅनरवर झळकलेले नेते मात्र या कार्यक्रमातूनच गुल झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे मोठा गाजावाजा करत केलेल्या या युवा मोर्चाच्या कार्यक्रमाकडे भाजपच्या प्रमुख नेत्यांनीच पाठ फिरवल्याने युवा मोर्चाला नेते किंमत देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
फलक लावताना केली दादागिरी
भारतीय युवा मोर्चाच्या वतीने मुंबईत तेजस्वी युवा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या युवा संवाद कार्यक्रमात मुंबईतील युवा मोर्चातील पदाधिकारी सहभागी झाले होते. भाजपचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सुर्या यांनी मार्गदर्शन केले. मुंबईतील युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या या तेजस्वी युवा संवाद कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील दोन्ही बाजुच्या पदपथांसह रस्ता दुभाजकांवर तेजस्वी सुर्या यांना शुभेच्छा देणारे फलक मुंबई भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी लावले होते. मुंबईत आजवर युवा सेनेसह अनेक विद्यार्थी संघटना तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मेळावे पार पडले. परंतु कुठल्याही मेळाव्यात जेवढी जाहिरात बाजी करण्यात आली नव्हती, त्यातुलनेत अधिक जाहिरातबाजी या मेळाव्यात करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण शिवाजी पार्कचा परिसर या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या बॅनरमुळे अक्षरश: झाकून गेला होता. त्यामुळे हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे की बॅनर पार्क आहे, असा सवाल शिवाजी पार्ककरांना पडला होता. या बॅनरमुळे परिसराला विद्रुप केल्या जाण्याच्या या भाजपच्या कृतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. दिवाळीच्या काळातही दीपावली पहाटेच्या शुभेच्छा देणारे फलक या परिसरात लावण्यात आले होते. दरम्यान, महापालिकच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी या कार्यक्रमाचे फलक लावण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्वरीत महापालिकेने ते फलक हटवले होते. परंतु त्यानंतर आयोजकांनी पुन्हा एकदा याठिकाणी फलक लावले. हे फलक लावताना तेजिंदर तिवाना यांच्या समर्थकांनी बॅनर लावण्यासाठी दादागिरी केल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी कार्यक्रम संपल्यानंतर शनिवारी सकाळी हे सर्व फलक तातडीने काढण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा मोठी बातमी! काॅंग्रेसचे 22 आमदार फुटणार, ठाकरे गटाचे नेते खैरे यांचा दावा)
कार्यक्रमाचे महत्व केले कमी
विशेष म्हणजे युवा मोर्चाच्यावतीने लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार व भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबईतील भाजपने नेते यांचे फोटो बॅनरवर झळकले असले तरी प्रत्यक्षा यापैकी कुणीही हजेरी लावली नाही. दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सभागृहात हा मेळावा आयोजित असतानाही लोढा आणि फडणवीस हे या युवा मोर्चाच्या कार्यक्रमाकडे फिरकलेही नाही. हा कार्यक्रम भाजप मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांनी आयोजित केला असला तरी या कार्यक्रमाकडे आधीच फडणवीस यांनी पाठ फिरवल्यामुळे, शेलारांनीही मग या कार्यक्रमात जाण्याचे टाळत या कार्यक्रमाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community