विरोधी पक्षनेते शिवसेना पुरस्कृत : भाजपच्या टीकेचा रवी राजांनी घेतला ‘असा’ समाचार

बेस्ट समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी आलेल्या डिजिटल तिकिटांच्या कंत्राट कामांच्या प्रस्तावावर भाजपाने आक्षेप घेत यामध्ये ३५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होतो. पण त्यानंतर सत्ताधारी पक्षाने चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर केला.

76

मागील काही महिन्यांपासून भाजप आक्रमक होत असताना महापालिकेतील विरोधी पक्षाचा कल हा सत्ताधारी पक्षाकडे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेते हे शिवसेना पुरस्कृत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते व महापालिकेचे नामनिर्देशित सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे. मात्र, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याचा तिखट शब्दांत समाचार घेत माझ्या विरोधी पक्षनेतेपदावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळे स्वत:च्या बालेकिल्ल्यात पराजीत झालेल्या आणि मागच्या दाराने आलेल्यांनी मला शिकवू नये, अशा शब्दांत भाजपाला खडे बोल सुनावले.

डिजिटल तिकिटाच्या प्रस्तावावरून भाजप-काँग्रेस आमनेसामने!

मुंबई महापालिकेत भाजपाने विरोध केल्यानंतरही केवळ विरोधी पक्षांच्या पाठबळावर सत्ताधारी पक्ष कामकाज रेटून नेत आहे. मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी आलेल्या डिजिटल तिकिटांच्या कंत्राट कामांच्या प्रस्तावावर भाजपाने आक्षेप घेत यामध्ये ३५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होतो. पण त्यानंतर सत्ताधारी पक्षाने चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर केला. भाजपच्या सदस्यांना बोलूही दिले नाही. त्यामुळे या प्रस्तावास सुरुवातीस वर्तमानपत्रातून विरोध करणारे विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी प्रत्यक्ष बैठकीत कोलांटी उडी मारत प्रस्तावास पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांचा खरा विरोधी चेहरा जनतेसमोर आला असल्याची टीका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली होती. तर भाजपचे प्रवक्ते व नामनिर्देशित सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी रवी राजा यांचा उल्लेख शिवसेना पुरस्कृत विरोधी पक्षनेते असा केला होता. शिरसाट यांनी विरोधी पक्षनेते हे शिवसेना पुरस्कृत असून ते त्यांनाच साथ देत असल्याची टीका केली.

(हेही वाचा : केईएम रुग्णालयात स्मृतिभ्रंशच्या आजाराकरता मेमरी क्लिनिक)

मुंबईच्या अवस्थेला भाजपही जबाबदार!

शिरसाट यांच्या टीकेचा समाचार घेत रवी राजा यांनी माझे विरोधी पक्षनेते पद हे मी सर्वोच्च न्यायालयात जावून मिळवले आहे. ते मला कुणी दिले नाही. त्यांची पोटदुखी मी समजू शकतो. कोणताही विरोध हा जाणूनबुजून केलेला नसावा. मुद्यावर विरोध असेल, तर आम्हाला मान्य आहे. पण यांचा विरोध हा विकास कामे रोखण्यासाठीच असतो, असे स्पष्ट केले. आज जरी ज्या शिवसेनेसोबत भाजपची युती तुटली असली तरी २० वर्षे ते एकत्रच नांदत होते. त्यांच्यासोबत ते सत्तेत होते. त्यामुळे मुंबईची जी वाट लागली, त्याला भाजपही जबाबदार आहे.

भाजपाचा हल्लाबोल!

महापालिकेत सत्तेत असताना भाजपने सुधार समिती अध्यक्षपद, बेस्ट समिती अध्यक्षपद, शिक्षण समिती अध्यक्षपद भुषवलेली आहेत. शिवाय महापौर परिषदेत तारासिंह आणि गोपाळ शेट्टी होते. हे त्यांनी विसरू नये, असा सवाल करत तुमची नक्की पोटदुखी काय, असाही सवाल शिरसाट यांना केला. जे स्वत:च्या बालेकिल्ल्यातील मतदार संघात हरतात. त्यांना मग मागच्या दाराने प्रवेश करावा लागतो. ते आता आम्हाला शिकवणार का, असा सवाल करत त्यांनी आधी त्यांनी निवडून यावे मग टीका करावी, असाही टोला मारला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.