पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या नाहीत, तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने हे कृत्य केले, असा दावा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. मात्र हा दावा निराधार व तथ्यहीन असून यामार्फत मतदारांची दिशाभूल करण्याचा आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वडेट्टीवार यांनी करकरे यांच्या मृत्युमागे भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांना दोषी ठरवून त्यांची व पक्षाची बदनामी केली आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाविषयी चौकशी करुन त्यांच्यावर भादंविअंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करणारे पत्र भारतीय जनता पार्टीने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. या तक्रारीसोबतच या विषयीची सर्व कागदपत्रेही जोडण्यात आली असल्याचे भाजपाने माहिती दिली.
काय म्हटले भाजपाच्या पत्रात?
26/11 मुंबई अतिरेकी हल्ला प्रकरण (अजमल कसाब) याची प्रथम सुनावणी विशेष न्यायालयासमोर झाली. सर्व पुरावे, साक्षी पुरावे तपासून न्यायालयाने आरोपी अजमल कसाब यास फाशीची शिक्षा दिली. त्यानंतर आरोपी अजमल कसाब याला कन्फर्मेशन केस उच्च न्यायालयात दाखल केली. या अपीलामध्ये सुनावणी होऊन अजमल कसाब याची फाशी कायम केली व सर्वोच्च न्यायालयानेही अजमल कसाब याची फाशी कायम केली. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जे विधान केले आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे आणि न्यायालयाचा अवमान करणारे आहे, असा आरोप भाजपाने दिलेल्या पत्रात करण्यात केला आहे. भाजपाच्या निवडणूक विधी विभागाचे सहसंयोजक ॲड. शहाजीराव शिंदे, ॲड. मनोज जयस्वाल यांनी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वडेट्टीवार यांच्या आरोपांमध्ये पुराव्यांचा अभाव तर आहेच पण राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासाठी ते राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचेही दिसते.
Join Our WhatsApp Community