मुंबईसमोर समस्यांचा ‘तिढा’, पण गप्प आहेत भाजपचे ‘लोढा’…

मंगलप्रभात लोढा मुंबई अध्यक्ष म्हणून फक्त नावालाच उरलेत का?, असा सवाल आता भाजपचे कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत.

85

दोन दिवस पडलेल्या पावसामुळे मुंबईची दरवर्षी प्रमाणे तुंबई झाली. मुंबईत पाणी भरल्याने शिवसेना पुन्हा एकदा विरोधकांच्या रडारवर आली. सर्वच विरोधी पक्षांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. मात्र मुंबईत इतकं सगळं घडूनही, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा मात्र कुठेच दिसले नाहीत. राज्यात विरोधी बाकावर असलेली भाजप विविध मुद्द्यावर सरकार आणि विशेषतः शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. मात्र त्याच वेळी भाजपचे  मुंबई अध्यक्ष असलेले मंगलप्रभात लोढा मात्र चिडीचूप आहेत. त्यामुळे मुंबई अध्यक्ष फक्त नावालाच उरलेत का?, असा सवाल आता भाजपचे कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत.

भाजपमध्येच लोढांविरोधात नाराजी

मंगलप्रभात लोढा हे कार्यकर्त्यांना भाव देत नाहीत, त्यांची बोलण्याची पद्धत यामुळे मुंबईत बरेच भाजपचे कार्यकर्ते हे त्यांच्यावर नाराज आहेत. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना, तसेच शिवसेनेच्या विरोधात इतके विषय असताना मंगलप्रभात लोढा हे मात्र कुठेच दिसत नसल्याने, मुंबईत भाजपमध्ये दोन मतप्रवाह पहायला मिळत आहेत.

(हेही वाचाः आता शिवसेनेचे शेवाळेही ‘ख्वाजा’च्या हवाली!)

शेलार-भातखळकर लढवतात खिंड

एकीकडे भाजपचे मुंबई अध्यक्ष शांत असले, तरी भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा मुंबई भाजपमध्ये आजही दरारा कायम आहे. मुंबईचे अध्यक्ष असताना आशिष शेलार यांनी शिवसेनेला सळो की पळो करुन सोडले होते. एवढेच नाही, तर 2017च्या पालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी शेलारांनी घेतलेल्या मेहनतीचे ते फळ असल्याचे, आजही भाजपचे मुंबईतील कार्यकर्ते सांगतात. तसेच आजही आशिष शेलार हे मुंबईच्या मुद्द्यावर आवाज उठवत असतात. जे काम भाजपच्या मुंबई अध्यक्षाने करायला हवे, ते आशिष शेलार आणि अतुल  भातखळकर करत आहेत. त्यामुळे जे भाजपच्या मुंबई अध्यक्षांना जमत नाही, ते शेलार आणि भातखळकर करुन दाखवत असून, मुंबई अध्यक्ष बदलायला हवा, अशी भावना देखील काहींच्या मनात आहे.

लोढा यांच्या कार्यकारिणीतले सदस्यही गायब

मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी कार्यकारिणी जाहीर केली होती. यात आमदार पराग अळवणी, योगेश सागर यांच्यासह तेरा जणांची उपाध्यक्ष आणि अमित साटम, सुनील राणे यांची सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या कार्यकारिणीत असलेले नेते देखील फक्त त्यांच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित आहेत. या कार्यकारिणीत कॅप्टन सेल्वन, राजहंस सिंह, शलाका साळवी, राजेश हाटले, डॉ. शिरीष जाधव, प्रकाश दरेकर, अमरजित सिंह यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. तर विनोद शेलार, महेश पारकर, प्रवीण छेडा, एकनाथ संगम, अमोल जाधव यांची चिटणीसपदी नेमणूक केली होती. तसेच शीतल गंभीर-देसाई यांची महिला मोर्चाच्या प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रमुखपदी जयप्रकाश सिंह यांची नेमणूक केली होती, मात्र सध्या हे सर्वच जण गायब आहेत.

(हेही वाचाः फक्त घोषणाच नाही, काँग्रेसची स्वबळासाठी तयारीही सुरू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.