मनी लॉडरिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर, विरोधीपक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला नाही तर विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपने ठाकरे सरकारला दिला होता. नवाब मलिक यांचा राजीनामा त्वरित घेण्यात यावा या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
( हेही वाचा : “आम्ही अजून खोलात गेलेलो नाही पण…”, फडणवीसांचा पवारांना इशारा )
भाजपचा धडक मोर्चा
भायखळा ते आझाद मैदान या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आता हा मोर्चा आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा याभागात काढण्यात येणार आहे. नवाब मलिक राजीनामा द्या, तुरूगांतील मंत्री..पाताळयंत्री, अंडरवर्ल्ड के नवाब कौन ..जवाब दो मलिक अशाप्रकारचे बॅनर भाजपच्या वतीने संपूर्ण मुंबईसह आझाद मैदानात लावण्यात आले आहे. भाजपच्या मोर्चाला थोड्याच वेळात सुरूवात होणार असून, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी होणार आहेत. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आझाद मैदानात पोहोचल्यावर या मोर्चाला सुरूवात होईल.
मलिकांच्या कोठडीत वाढ
ईडीच्या विशेष न्यायालयाने नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २१ मार्चपर्यंत मलिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मलिकांना २१ मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने दिले आहेत.
Join Our WhatsApp Community