युवा सेनेच्या ‘त्या’ मागणीचा भाजपने घेतला समाचार!

आधी परवानगी दिली तरच ते मंडप उभारतील ना, असा सवाल भाजपने केला आहे.

गणेश मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेते आणि गणेश उत्सव मंडळांच्या मंडपांना भाडे व शुल्क माफ करण्याची मागणी युवा सेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी केल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याचा समाचार घेतला. भाडे शुल्क माफ वगैरे ठीक आहे, पण आधी गणेश मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेत्यांना तसेच उत्सव मंडळांना मंडप घालण्यास प्रथम परवानगी दिली जावी. आज गणेश मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेत्यांना मंडप उभारण्यास परवानगी दिली जात नाही. परवानगी दिली तरच ते मंडप उभारतील ना, असा सवाल भाजपचे दक्षिण मध्य विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी केला आहे.

युवा सेनेच्या नेत्यांनी केली होती मागणी

गणेश मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेत्यांचे मंडप भाडे माफ करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक आणि युवा सेना पदाधिकारी अमेय घोले यांनी केली होती. त्यानंतर शिवसेनेचे प्रभादेवी येथील नगरसेवक आणि युवा सेना पदाधिकारी समाधान सरवणकर यांनी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना महापालिकेचे भाडे, परवानगी शुल्क तसेच इतर शुल्क माफ करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. युवा सेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केलेली असतानाच भाजपच्या नगरसेविका राजेश्री राजेश शिरवडकर यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना निवेदन देत गणेश मूर्तींची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना मंडपाची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचाः गणेशोत्सवातील मंडपांच्या भाडे माफीसाठी युवा सेना सरसावली)

आधी परवानगी तर द्या

याबाबत बोलताना दक्षिण मध्य मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी युवा सेनेच्या नगरसेवकांचा समाचार घेतला आहे. आज गणेश मूर्ती बनवणारे मूर्तिकार, तसेच गणेश मूर्ती विक्रेत्यांना मंडप बांधण्यास परवानगी देणे गरजेचे आहे. ही परवानगीच महापालिका देत नाही. जर परवानगी दिली, तर भाडे शुल्काचा मुद्दा उपस्थित होतो. आज या सर्वांची प्रमुख मागणी आहे ती म्हणजे मंडपांना परवानगी देण्याची. पण महापालिका प्रशासन ही परवानगी देत नाही. भाडे शुल्क निश्चितच माफ व्हायला पाहिजे. परंतु परवानगीच दिली नाही तर शुल्कही भरावे लागणार नाही.

हा दुजाभाव का?

दरवर्षी छोटे व्यावसायिक महापालिकेकडे मंडपांच्या परवानगीसााठी अर्ज करत असतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी मुर्त्यांची विक्री झाल्यानंतर हे व्यावसायिक स्वत:च मंडप काढून टाकतात. याउलट मुंबईतील अनेक हॉटेल मालक मंडपांची एक महिन्याची परवानगी घेतात आणि तीन ते चार महिने मंडप काढत नाहीत. अशाप्रकारे हॉटेल मालक महापालिकेची फसवणूक करत आहेत. त्यांना मात्र महापालिका परवानगी देते. परंतु सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या गणेश मूर्ती व्यावसायिकांना मंडपासाठी परवानगी नाकारली जाते. हा दुजाभाव का, असा सवाल शिरवडकर यांनी केला आहे.

(हेही वाचाः जे परदेशींना जमले, ते चहल यांना कधी जमणार?)

सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न

राज्यात आणि महापालिकेत ज्यांची सत्ता आहे, त्यांच्याकडून गणेश मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेते तसेच उत्सव मंडळांची दिशाभूल केली जात आहे. जिथे मंडपांना परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवे, तिथे भाडे शुल्क माफ करण्याची मागणी करत एकप्रकारे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप शिरवडकर यांनी केला.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here