मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची अवघ्या १२ महिन्यांतच ठाकरे सरकारने बदली केली आहे. जयस्वाल हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जात असून, मुंबईतील जम्बो कोविड सेंटरच्या निर्मितीत त्यांचा महत्वाचा वाटा होता. परंतु मागील काही दिवसांपासून त्यांचे शहराच्या पालकमंत्र्यांसोबत खटके उडत असून, त्याचाच वचपा काँग्रेसने घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जयस्वाल यांची बदली करुन, त्यांच्या जागी संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत जयस्वाल?
मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांची ९ जून २०२० मध्ये राज्य सरकारने नियुक्ती केली होती. संजीव जयस्वाल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९६च्या बॅचचे अधिकारी असून, त्यांनीही आतापर्यंत महत्त्वपूर्ण अशा विविध पदांवरचे काम पाहिले आहे. यामध्ये प्रामुख्याने सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नाशिक व तळोजा (जि.नंदुरबार) येथे त्यांनी काम केले आहे. त्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयात उप सचिव, चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, नागपूर महापालिकेचे आयुक्त, औरंगाबाद प्रशासकीय विभागाचे विभागीय आयुक्त आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणूनही जयस्वाल यांनी काम पाहिले आहे.
(हेही वाचाः एसआरपीएफ जवानांच्या बदलीचा कालावधी बदलला!)
इथे करण्यात आली नियुक्ती
त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या विशेष कार्यांबद्दल त्यांना विविध सन्मान आणि पारितोषिके प्राप्त झाली आहेत. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर, कोविड सेंटर मध्ये संशयित रुग्णांना जेवणाची व्यवस्था, तसेच मुंबईतील जंबो कोविड सेंटरची निर्मिती, शहर भागांतील पायाभूत सुविधा आदींची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली.
परंतु मुंबई महापालिकेत खांद्यावर आलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडत असताना, जयस्वाल यांची बदली करत त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य मत्स्य विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी नागपूर प्रशासकीय विभागाचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.