स्मशानभूमींच्या स्वच्छतेत महापालिकेचा ‘सिक्स सेन्स’

प्रशासनाला आता स्मशानभूमींच्या स्वच्छतेसाठी कमी दरात लावलेल्या बोली कशा चालतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

80

मुंबईत एका बाजूला महापालिकेने केलेल्या अंदाजित रकमेपेक्षा कमी दरामध्ये भरलेल्या निविदा रद्द करुन, त्यांची इसारा रक्कम रद्द केली जात आहे. तर दुसरीकडे स्मशानभूमी आणि दफनभुमीच्या स्वच्छतेसाठी नेमण्यात येणाऱ्या कंत्राट कामांसाठी चक्क उणे ४६ टक्के कमी दरात बोली लावणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करत महापालिका प्रशासनाने आपला सिक्स सेन्स दाखवून दिला आहे.

या निविदा कशा चालतात?

मुंबईतील ४२ स्मशानभूमींच्या स्वच्छता आणि राखणीसाठी चार विभागांमध्ये काढण्यात आलेल्या निविदांमध्ये एकमेव कंपनी पात्र ठरली असून, चक्क ४६ टक्के कमी दरात त्यांनी हे काम मिळवले आहे. त्यामुळे उद्यान आणि मैदानांच्या देखभालीमध्ये कमी बोली लावण्यात आल्याने निविदा रद्द करणाऱ्या प्रशासनाला आता स्मशानभूमींच्या स्वच्छतेसाठी कमी दरात लावलेल्या बोली कशा चालतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(हेही वाचाः रस्त्यांच्या निविदांवरुन भाजपा-शिवसेना भिडले)

अशी आहे सिक्स सेन्स निविदा

मुंबईतील स्मशानभूमी तथा दफनभूमी स्वच्छ राखण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत हाऊसकिपिंगच्या सेवेची वाढीव मुदत ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या कामांसाठी मागवलेल्या निविदा ३१ मे २०२१ रोजी उघडण्यात आल्या. यामध्ये प्रति चौरस फूट प्रति महिन्यासाठी १.६९ एवढा दर निश्चित करुन निविदा मागवण्यात आल्या होत्या. परंतु यामध्ये पात्र ठरलेल्या सिक्स सेन्स कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ०.९१ एवढा दर लावला, तर अन्य कंपन्यांनी जास्त दर आकारला आहे. त्यामुळे कमी बोली लावणारी सिक्स सेन्स कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चार भागांमध्ये पात्र ठरली आहे. विशेष म्हणजे या कंपनीने अंदाजित दरापेक्षा चक्क ४६ टक्के कमी दराने काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

(हेही वाचाः उद्यान, मैदानांच्या कंत्राटदारांना ऑडिट करूनच बिले द्या! भाजपची महापालिकेकडे मागणी)

वेगवेगळे नियम कसे?

पुढील तीन वर्षांसाठी या देखभाल आणि स्वच्छतेच्या कामांवर सुमारे १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कंपनीने चक्क अंदाजित खर्चापेक्षा निमपटीने दर लावत मिळवण्याचा प्रयत्न केल्याने, एकाच महापालिकेत आता वेगवेगळे नियम कसे, असा असा सवाल केला जात आहे.

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

उद्यान व मैदानांच्या देखरेखीसाठी काढलेल्या निविदांमध्ये कंत्राटदारांनी अंदाजित खर्चापेक्षा ३० ते ३६ टक्के कमी बोली लावल्याने महापालिकेने निविदा रद्द करुन फेरनिविदा मागवली. त्यानंतर अशाचप्रकारे रस्ते कंत्राट कामांच्या निविदांमध्ये कंत्राटदारांनी अंदाजित रकमेपेक्षा कमी बोली लावत काम मिळवल्याने, या निविदा रद्द करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यानंतर आता स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी संस्थांची नेमणूक करण्यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये एवढ्या कमी दरात निविदांमध्ये भाग घेतल्याने आता प्रशासनाला जर त्यांना हे काम द्यायचे असेल, तर लोकप्रतिनिधींची काय भूमिका राहील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

(हेही वाचाः कंत्राटदारांना मदत: महापालिकेच्या अधिकाऱ्याला ‘ही’ शिक्षा)

चार भागांमध्ये स्मशानभूमीच्या स्वच्छतेवर केला जाणारा खर्च

मुंबई शहर (एकूण स्मशानभूमी : ०९)

मासिक खर्च : ११ लाख ७८ हजार ७४४

तीन वर्षांचा खर्च : ४ कोटी २४ लाख ३४ हजार ८१४

पश्चिम उपनगरे वन (एकूण स्मशानभूमी : १३)

मासिक खर्च : ६ लाख ११ हजार २२९

तीन वर्षांचा खर्च : २ कोटी २० लाख ०४ हजार २५२

पश्चिम उपनगरे दोन (एकूण स्मशानभूमी १२)

मासिक खर्च : ८ लाख ३६ हजार १५८

तीन वर्षांचा खर्च : ३ कोटी ०१ लाख ०१ हजार ७२२

पूर्व उपनगरे (एकूण स्मशानभूमी १६)

मासिक खर्च : १५ लाख ८८ हजार ६३६

तीन वर्षांचा खर्च : ५ कोटी ७१ लाख ९० हजार ६९०

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.