विक्रोळी, भांडुप व चेंबूर या तिन्ही ठिकाणी संरक्षक भिंत पडण्याच्या घटनेला मुंबई महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. महापालिका व प्रशासन यांनी जबाबदारीने वेळीच योग्य कार्यवाही केली असती, तर आज हे निष्पाप जीव वाचू शकले असते. परंतु महापालिकेने बांधलेली निकृष्ट दर्जाची संरक्षक भिंत या दुर्घटनेला कारणीभूत आहे. त्यामुळे या दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्यात यावी व या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या दोषींविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
तसेच मुंबई परिसरात ज्या भागात अशा प्रकारच्या संरक्षक भिंती बांधल्या आहेत, त्याठिकाणच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेची व्यवस्था तात्काळ महापालिकेने करावी, अन्यथा मुंबईतील पावसाळ्यामुळे अन्य ठिकाणीही मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.
(हेही वाचाः मुंबईतील चेंबूर, विक्रोळी परिसरात मोठ्या दुर्घटना! घरे कोसळून अनेकांचा मृत्यू)
अनेक कुटुंब उद्ध्वस्त
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी रविवारी विक्रोळी येथील सूर्यानगर, भांडुपमधील मुन्शी महल परिसर व चेंबूरमधील भारतनगर येथील घटनास्थळी भेट देऊन, मदत कार्याचा आढावा घेतला. तसेच त्या दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. विक्रोळी येथील दुर्घटनेत अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. काही कुटुंबातील मुले-मुली अनाथ झाले आहेत. अशाच एका कुटुंबाचीही दरेकर यांनी भेट घेतली. या कुटुंबातील लहान भाऊ-बहिण अनाथ झाली आहेत. या पोरके झालेल्या लहान भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी भाजापतर्फे उचलण्यात येईल, असे वचन त्यांनी या कुटुंबाला दिले. यावेळी भाजापचे खासदार मनोज कोटक उपस्थित होते.
निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे बळी
विक्रोळी,भांडुप,चेंबूर सारख्या दुर्घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिका यांसारख्या यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. निष्पाप मुंबईकरांचे बळी रोज जात आहेत. असा एकही पावसाळा नाही गेला ज्यामध्ये मुंबईकरांनी बळी पाहिले नाहीत. प्रशासन व महापालिका यांच्या बेजबाबदारपणाचे हे बळी आहेत. मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर गेली वर्षोनुवर्षे पाणी तुंबण्याची ठिकाणे तीच-तीच आहेत. तरीही पालिका हे थांबवण्यासाठी काहीही ठोस व कायमस्वरुपी यंत्रणा उभी करत नाही. विक्रोळीची पडलेली भिंत पूर्वीही पडली होती, ती पुन्हा बांधली. पण त्यावेळी निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले. त्यामुळे रहिवाशांचा नाहक बळी गेला. जे बळी गेले त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आता तरी कडक उपाययोजना करा, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः मुंबईकरांनो आता पाणी उकळूनच प्या… महापालिकेचे आवाहन)
कारवाई करण्याची मागणी
मुंबईकरांचे आणखी बळी घेऊ नका. आता केवळ पालिकेने धोक्याची नोटीस बजावून त्यांची जबाबदारी सुटत नाही. त्या रहिवाशांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची जबाबदारीही मुंबई महापालिकेची आहे. नोटीस लाऊन प्रश्न सुटतो का? त्यांना पर्यायी घरे कोण देणार, असा सवाल त्यांनी केला. आता या प्रकरणाची चौकशी समिती लावली जाईल. आठ दिवसांनी सगळे शांत होईल. तथापि या दुर्घटनेची चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
Join Our WhatsApp Community