महापालिकेत मराठीचा घोटला जातोय गळा! समाज माध्यमांतून उठतोय आवाज

मराठी भाषेतून एकही परिपत्रक, माहिती किंवा सूचना दिली जात नाही. प्रत्येक ठिकाणी इंग्रजाळलेली भाषा वापरली जात असल्याने, यावर समाज माध्यमांमध्ये नागरिकांकडून जोरदार हल्ला चढवला जात आहे.

मुंबई महापालिकेचे कामकाज हे १०० टक्के मराठीतून करण्याचा नियमच असून प्रशासनाचे तसे परिपत्रकच आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून हे परिपत्रक पायदळी तुडवून प्रशासन इंग्रजी भाषेतून काम करत आहे. एकेकाळी मराठीचा अट्टाहास धरणारी शिवसेना महापालिकेत सत्तेवर असतानाही, हा प्रकार सुरूच आहे. त्यातच हा पक्ष राज्यात सत्तेतील प्रमुख पक्ष आहे, तरीही मुंबई महापालिकेत मराठी भाषेची गळचेपी सुरू असून, कोरोना काळात तर असली नसलेली मराठी भाषाही प्रशासनाने अरबी समुद्रात बुडवून टाकली आहे. मराठी भाषेतून एकही परिपत्रक, माहिती किंवा सूचना दिली जात नाही. प्रत्येक ठिकाणी इंग्रजाळलेली भाषा वापरली जात असल्याने, यावर समाज माध्यमांमध्ये नागरिकांकडून जोरदार हल्ला चढवला जात आहे.

अधिका-यांसाठी सोयीची इंग्रजी

मुंबई महापालिकेच्या कामकाजाची भाषा ही मराठी की, इंग्रजी याचा विसर आता प्रशासनालाच पडू लागलाय. मुंबई महापालिकेतील सनदी अधिकाऱ्यांना तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना इंग्रजी भाषा सोयीची जात असल्याने, ते मराठी भाषेला जाणीवपूर्वक विसरत आहेत. महापालिकेचे कामकाज १०० टक्के मराठीतूनच केले जावे याबाबत सामान्य प्रशासनाच्या वतीने सुधारित परिपत्रके काढून प्रशासनाला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना याची आठवण दिली जाते.

(हेही वाचाः ठाकरे सरकारला मराठीचे वावडे!  )

नागरिकांकडून विचारणा

पण मराठी भाषा ही केवळ परिपत्रकापुरतीच सीमित असून, प्रत्यक्षात इंग्रजीतूनच कामकाज केले जात आहे. मागील काही दिवसांतील जनतेसाठी बनवलेली मार्गदर्शक तत्वे व त्यांची माहिती, प्रशासकीय आदेश हे इंग्रजीतूनच दिले जातात. दोनच दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकृत ‘माझी मुंबई, आपली बीएमसी’ या ट्विटर खात्यावर रविवारी लसीकरण केंद्र बंद राहणार असून सोमवारी कुठे सुरू असेल याची माहिती दिली जाईल, असा संदेश इंग्रजी भाषेतून दिला होता.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अनेक नागरिकांनी हा संदेश मातृभाषेतून का नाही अशी विचारणा केली आहे. मराठी राजभाषेत हा संदेश प्रसारित करा अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. आपण ज्या संस्थेस अथवा कंपनीला ट्विटरचे काम दिले आहे, त्यांना आधी शासकीय नियम शिकवा, असा पदोपदी महाराष्ट्राचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

सत्ताधारी प्रशासनाच्या ताटाखालचे मांजर

मुंबई महापालिकेने या मुख्य ट्विटर खात्यासह २४ विभागीय कार्यालये आणि अन्य खात्यांची ट्विटर खाती चालवण्यासाठी ‘एस टू’ या खासगी कंपनीची निवड केली आहे. य कंपनीच्या माणसांना मराठी भाषेची मोठी अडचण असून, त्यांना इंग्रजी भाषा ही सोयीची वाटते. त्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून प्रशासन मराठी भाषेचा घोट घ्यायला निघाले आहे. विशेष म्हणजे प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून मराठी भाषेतून कामकाज केले जात नसल्याने, ना महापालिकेतील सत्ताधारी आवाज उठवत, ना विरोधी पक्ष. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी वर्ग वरिष्ठांच्या सूचनेनुसार मराठीला महापालिकेतून हद्दपार करत आहे आणि मराठीचे कैवारी म्हणणारे सत्तेवर असूनही, प्रशासनाच्या ताटाखालील मांजर बनून त्यांना साथ देत असल्याचे पहायला मिळत आहे.

(हेही वाचाः शाळा वाचवा, आपली मराठी जगवा!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here