मुंबई महापालिकेचा सन २०२३-२४ अंदाजित अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी प्रशासक इक्बालसिंह चहल यांना सादर केला. सुमारे ६५.३३ कोटी रुपये शिलकीचा ५२६१९.०७ कोटींचा या अर्थसंकल्पात चालू विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करण्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. मात्र या अर्थसंकल्पात पूर्णपणे सरकारची छाप दिसून येत आहे. तब्बल ३७ वर्षांनी प्रशासकांच्या माध्यमातून महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे.
मुंबई महापालिकेत तब्बल ३६ वर्षांनी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रशासकाची नेमणूक झाली आहे. त्यामुळे तब्बल ३७ वर्षांनी प्रशासक म्हणून इक्बाल सिंह चहल यांना प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळाला आहे. एप्रिल १९८४ मध्ये द.म. सुखटणकर यांची पहिले प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तर पुढे १२ नोव्हेंबर १९८४ ते ०९ मे १९८५ या कालावधीत जे.जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे फेब्रुवारी १९८५मध्ये जे.जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी चहल यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये प्रारंभी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर केला आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर केला. अर्थसंकल्पाचे आकारमान मागील वर्षाच्या तुलनेत १४.५२ टक्क्यांनी जास्त आहे. मागील अर्थसंकल्पात ४५९४९. २१ कोटी रुपये होते, तर यावर्षी ५२, ६१९.०७ कोटी रुपये एवढे आहे. हा अर्थसंकल्प आनंदमय असल्याचे महापालिका प्रशासकांनी म्हटले आहे
Join Our WhatsApp Community