मुंबई महापालिकेच्या सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प येत्या शनिवारी, ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी मांडला जाणार आहे. महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल हे सादर करणाऱ्या अर्थसंकल्पात आगामी सार्वत्रिक निवडणूक पाहता कोणत्याही प्रकारची करवाढ आणि दरवाढ न करणारा हा अंदाजित अर्थसंकल्प असेल असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे महसूली उत्पन्न कमी होत असले तरी जीएसटीची १२ टक्क्यांवरून १८ टक्के झाल्याने यावरील वाढलेला खर्च तसेच इतर प्रकल्पही पूर्णत्वास येत असताना त्यावरील खर्च वाढला जात असल्याने येत्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भांडवली खर्च सुमारे २२ ते २४ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला जाण्याची शक्यता असून महसूली उत्पन्न कमी होणार असल्याने अंतर्गत कर्जाच्या आधारे मूळ अर्थसंकल्पाचा आकार ४९ हजार कोटींपर्यंत वाढला जाईल अशी शक्यता आहे.
विशेष म्हणजे कचरा वापरकर्ता शुल्क व प्रक्रिया व निष्कासन आकार तसेच कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्याचा तसेच कोणताही कर अथवा दरवाढ करण्याचा प्रशासनाचा विचार नाही. विशेष म्हणजे सर्वसामान्यांकडून आकारले जाणारे रुग्णालयातील केस पेपरचे दहा रुपये तसेच इतर चाचण्यांकरता आकारले जाणारे प्रति नमुना ५० ते १०० रुपयांचे शुल्कही माफ केले जाण्याची घोषणा या अर्थसंकल्पातून केली जाण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा सत्यजित तांबेसाठी शरद पवारांनी केले लॉबिंग; अजित पवारांचा धक्कादायक खुलासा)
मुंबई महापालिकेत तब्बल ३६ वर्षांनी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रशासकाची नेमणूक केल्यानंतर ते प्रथम प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करणार आहे. एप्रिल १९८४ मध्ये द.म. सुखटणकर यांची पहिले प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तर पुढे १२ नोव्हेंबर १९८४ ते ०९ मे १९८५ या कालावधीत जे.जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे फेब्रुवारी १९८५ मध्ये जे.जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी चहल हे प्रशासक म्हणून अर्थसंकल्प मांडणार आहेत. यामध्ये प्रारंभी सकाळी साडेदहा वाजता अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर करतील आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर करतील.
सन २०२२-२३ च्या सुमारे ४५ हजार ९४९ पूर्णांक २१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात १८ हजार ४४४ पूर्णांक ७४ कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित होता. परंतु आता महापालिकेचा सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून आगामी वर्षात ते पुर्णत्वास येणार असल्याने यासाठी ३२०० कोटी रुपयांच्या तुलनेत सुमारे पाच ते साडे पाच हजार कोटींची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. तसेच गोरेगाव मुलुंड लिंक रोडचे कामही पुढील वर्षात पुर्णत्वाच्या दिशेने असल्याने सध्याच्या १३०० कोटींच्या तुलनेत पाच कोटींच्या आसपास तरतूद करण्याची गरज भासणार आहे. वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्पही मार्गी लागणार असल्याने यासाठी सध्याच्या १६७ कोटींच्या तुलनेत ८०० ते १००० कोटी, मिठी नदी प्रकल्पाच्या कामासाठीही सुमारे अडीच ते तीन कोटी रुपये तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.
आरोग्य खात्याच्यावतीने मुलुंड एम.टी अगरवाल रुग्णालय बांधून तयार होत असल्याने यासाठी १०० कोटी रुपये, तसेच गोवंडी रुग्णालय, कुपर रुग्णालय, नायर रुग्णालय, वांद्रे भाभा, शीव रुग्णालय आदी रुग्णालयांची कामेही २०२३ आणि त्यापुढील वर्षांत पूर्णत्वास येत असल्याने यासाठी भरीव निधीची तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्या निधीतही वाढ होण्याची शक्यता असून सुमारे तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा निर्मला सीतारामण यांच्याकडून अर्थसंकल्पाचे सर्वात वाईट सादरीकरण – डॉ. नरेंद्र जाधव)
याबरोबरच क्रॉफर्ड मार्केटचे कामही पूर्णत्वास येत असल्याने सुमारे १५० ते २०० कोटींची तरतूद करावी लागणार आहे. मुंबईत भविष्यात वाहनतळ निर्माण होत असली तरी उद्यानाखाली भूमिगत वाहनतळांना प्राधान्य देण्यासाठी काही ठोक निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे.
मुंबईत एसव्ही रोड कोरा केंद्रचे काम पूर्ण झाले असून राम मंदिर रोड ते रिलिफ रोड येथील वाढीव पुलाचे काम, तेली गल्ली, विद्याविहार व विक्रोळी रेल्वे पुलावरील बांधकाम, डिलाईट रोडवरील पूल आदींच कामे पूर्णत्वास आल्याने तसेच गोखले पूल, महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील सातरस्ता जंक्शन ते डॉ ई मोझेस रोड ते सातरस्ता जंक्शन यांना जोडणाऱ्या पुलाच्या कामांसह गोरेगाव येथील खाडीपुलाच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने पुल विभागाच्या बांधकामासाठी सुमारे दीड ते दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.
मुंबईतील रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे २०२१मध्ये काढलेल्या निविदेतील कामे मोठ्याप्रमाणात सुरु आहे तसेच सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांना फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होत असल्याने आगामी अर्थसंकल्पात सध्या २२०० कोटी रुपयांच्या तुलनेत चार ते साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे.
मलनि:सारण प्रचलन आणि प्रकल्पाची कामे युध्दपातळीवर सुरु असल्याने यासाठीच्या निधीचीही गरज भासणार असून चालू अर्थसंकल्पातील दोन हजार कोटींच्या तुलनेत अडीच कोटींहून अधिक तरतूद होण्याची शक्यता आहे. तर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने पवई ते घाटकोपर तसेच अमर महल ते सदाकांत ढवण मैदान आदी जलबोगदा प्रकल्पाची कामे पूणत्वास येत असल्याने पाणी पुरवठा विभागासाठी चालू आर्थिक वर्षात केलेल्या ६०० कोटींच्या तुलनेत ८०० ते ९०० कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने टप्पा ११ अंतर्गत शौचालयांच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्याने तसेच नवीन टप्पा १२ची कामे हाती घेण्यात येणार आहे, आश्रय योजनेची पुढील वर्षांत ५० टक्क्यांहून कामे पूर्ण होणार आहे, शिवाय कचरा प्रकल्प राबवण्यासाठीही येत्या वर्षात कामे व योजना राबवल्या जाणार असल्याने सुमारे ९०० ते १००० कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community