मुंबई महापालिका ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येत असतानाच महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी महापालिकेचा ४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्पी अंदाज सादर केला. मात्र, नगरसेवकांची मुदत संपुष्टात आल्याने प्रशासकांना निधी खर्च करण्यात कोणत्याही अडचणी नव्हत्या. परंतु जिथे नगरसेवक असताना विकास कामांना गती देण्यास प्रशासनाला विलंब व्हायचा, तिथे प्रशासक असताना तेवढाच विलंब होऊन मुंबईच्या विकासाच्या गतीला खिळ बसली आहे. मुंबईत सौंदर्यीकरण, रस्त्यांची कामे, आपला दवाखाना वगळता प्रशासनाला अन्य मोठ्या विकास प्रकल्पांसहित अन्य प्रस्तावित कामांना म्हणावी तेवढी गती देता आलेली नाही.
आजार झाल्यानंतर उपचारात्मक उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याच्यादृष्टीकोनातून शिव योग केंद्रासारखे उपक्रम सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा आयुक्तांनी केली, त्यानुसार मुंबईतील १७० ठिकाणी योग केंद्र सुरु झाली. गिरगाव चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी मराठी नाट्य विश्व संग्रहालयाच्या कामाला सुरुवात झाली ही जमेची बाजू आहे.
परंतु कर्करोगावरील उपलब्ध अद्ययावत उपचार प्रणालीपैंकी एक प्रोटॉन थेरपी या सुविधेची उभारणी टाटा कर्करोग रुग्णालय यांच्या सहकार्याने मुंबईमध्ये उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले होते. परंतु प्रोटॉन थेरपीचा प्रस्ताव जन्माला येण्यापूर्वी गुंडाळण्याची वेळ प्रशासकांवर आली आहे. याशिवाय रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी टनेल धुलाई केंद्राचा प्रकल्पही प्रशासनाला गुंडाळावे लागले.
पर्यावरण खात्याचा एक भाग म्हणून हवामान कृती कक्षाची निर्मितीही प्रशासनाला अद्याप करता आलेली नाही. महापालिकेच्या जकात नाक्यांवर परिवहन आणि व्यावसायिक केंद्राच्या उभारणीच्या कामासाठी सल्लागार नेमणुकीच्या पलिकडे काहीच करता आलेले नाही, तसेच घाटकोपरमध्ये उभारण्यात येणारे कर्मवीर भाऊराव पाटील वेल्फेअअर सेंटर तसेच वरळीच्या धर्तीवर उपनगरात विक्रोळीत इंजिनिअर हब उभारणीच्या कामाची गती कागदावरच आहे.
कोणत्या प्रकल्पांसाठी करण्यात आलेल्या तरतुदीपैंकी खर्चाची टक्केवारी
- कोस्टल रोड प्रकल्पांसाठी ३२०० कोटी रुपये( ३० टक्के)
- गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी १३०० कोटी रुपये( ३० ते ३५ टक्के)
- मिठी नदीचे पुनरुज्जीव आणि पूर नियंत्रण करता ५६५.३६ कोटी रुपये( २५टक्के)
- दहिसर,पोईसर, ओशिवरा अणि वालभट नद्यांचे पुनरुज्जीवन करता २०० कोटी रुपये( १० ते १५ टक्के)
- सफाई कामगारांच्या आश्रय योजनेसाठी १४६०.३१ कोटींची तरतूद ( १५ ते २०टक्के)
- उद्यान विभागासाठी १४७.३६ कोटी रुपयांची तरतूद ( ५० ते ६० टक्के)
- वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाकरता ११५.४६ कोटींची तरतूद( २० टक्के)
- मुंबई अग्निशमन दलाकरता ३६५.५४ कोटींची तरतूद ( २० टक्के)
- समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाकरता २०० कोटींची तरतूद( ०८ टक्के)
- बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा प्रकल्पांतील ऊर्जा प्रकल्पासाठी १० कोटींची तरतूद ( २०टक्के)
- पाणी पुरवठा प्रकल्पांकरता १०५९.६६ कोटींची तरतूद( ३० ते ३५ टक्के)