अभियंत्यांच्या मागणीला केराची टोपली: हसनाळे यांच्याकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी चंदा जाधव यांच्याकडे

181

मुंबई महापालिकेच्या परिमंडळ एकच्या उपायुक्त चंदा जाधव यांची बदली घनकचरा व्यवस्थापन विभागात केल्यानंतर हे आदेशच रद्द करत परिमंडळ १ आणि घनकचरा व्यवस्थापन या दोहोंची जबाबदारी पुन्हा हसनाळे यांच्याकडे सोपवून जाधव यांना खात्याशिवाय ठेवण्यात आले होते. परंतु १५ ऑगस्टला घेतलेला हा निर्णय तब्बल ५७ दिवसांनी फिरवून जाधव यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन आणि हसनाळे यांच्याकडे परिमंडळ १ च्या उपायुक्त पदाची जबाबदारी सोपवत खांदेपालट केली आहे. आयुक्तांनी ११ ऑक्टोबर रोजी हे आदेश काढून एकप्रकारे अभियंत्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) हे पद अभियंता संवर्गातून भरले जावे अशी मागणी  संघटनांकडून होत आहे, परंतु अभियंता संवर्गासाठी असलेल्या या उपायुक्त(घनकचरा व्यवस्थापन) या पदावर कोणत्याही अभियंत्यांची वर्णी न लावता  उपायुक्त चंदा जाधव  यांची वर्णी लावल्याने एकप्रकारे अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त पदी असलेल्या डॉ. संगीता हसनाळे यांच्यावरील जबाबदारी काढून ही जबाबदारी परिमंडळ एकच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्यावर सोपवण्यात आली होती. १५ ऑगस्ट रोजी ही ऑर्डर काढल्यानंतर दोनच दिवसांमध्ये ही ऑर्डर फिरवून हसनाळे यांच्याकडे परिमंडळ एकसह घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी कायम राखली आणि चंदा जाधव यांना पदाविना ठेवण्यात आले. त्यामुळे चंदा जाधव या रजेवर गेल्या होत्या. पण आता रजेवर आल्यानंतर हसनाळे यांच्याकडील घनकचरा व्यवस्थापन पदाची जबाबदारी चंदा जाधव यांच्याकडे सोपवून, हसनाळे यांच्याकडे परिमंडळ १चा पदभार कायम ठेवला आहे.

( हेही वाचा: ठाकरे गटाच्या बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणी मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडून ‘या’ जिल्ह्यात तपास सुरू )

या दोन्ही खात्यांच्या उपायुक्तांच्या बदल्यावरून महापालिका आयुक्त हे टिकेचे धनी बनले होते. हसनाळे यांच्याकडील दोन पदांचा भार कमी करून पूर्णपणे परिमंडळ १ ची जबाबदारी सोपवली असली तर चंदा जाधव यांच्याकडे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) या पदाचा भार पुन्हा एकदा अडचणीची ठरणार आहे.

राष्ट्रीय अभियंता दिनाच्या दिवशी महापालिकेच्या अभियंता संघटनांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदन दिले होते. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी ही अभियंता संवर्गातील उपायुक्तांकडे सोपवण्याची मागणी केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावर तत्काळ  निर्णय घेण्याच्या सूचना केल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सकारात्मक भूमिका जाहीर केली होती. परंतु प्रत्यक्षात जेव्हा उपायुक्त(घनकचरा व्यवस्थापन) पदावरील अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला. त्यात अभियंता संवर्गातील उपायुक्तांकडे याची जबाबदारी सोपवली नाही. त्यामुळे महापालिकेतील अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली असून बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता संघटनेनेही नाराजी व्यक्त केली आहे. या पदावर अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांची वर्णी लागण्याची मागणी जोर धरु लागल्यानेच हसनाळे यांनी परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी कायम राहण्याचा निर्धार केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चंदा जाधव यांची या पदी नियुक्ती झाली असली तरी किती दिवस या पदावर राहतात की कुठल्या तरी दबावाखातर प्रशासन पुन्हा त्यांची बदली करता याचीच चर्चा महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये अधिक ऐकायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.