ठाकरे गटाच्या शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या नोकरीच्या राजीनाम्यावरून राजकारण चांगलंच तापले आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा अजूनही मंजूर केलेला नाही. तर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर राज्य सरकारचा दबाव असल्यानेच लटकेंचा राजीनामा मंजूर करत नसल्याचा आरोप शिवसेनेने केले आहे. यावर आता महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचा – संजय राऊतांचं कोठडीत जाण्यापूर्वी आईला भावनिक पत्र; म्हणाले, “आई, मी नक्कीच…”)
काय म्हटले महापालिका आयुक्त
ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या ३० दिवसात ही प्रक्रिया करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत केवळ दोन दिवस बाकी असताना ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीविषयी अद्याप संदिग्धता कायम असल्याचे चित्र आहे.
ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आज, बुधवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देताना चहल म्हणाले, ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर नेमका काय निर्णय घ्यायाचा याची प्रक्रिया सुरू असून येत्या ३० दिवसात या राजीनाम्यावर निर्णय होईल. दरम्यान, ऋतुजा लटके यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात गुरूवारी सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे.
ऋतुजा लटके या माहिपालिकेच्या सेवेत असून त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर पालिका आयुक्त चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा राजीनामा मंजूर करायचा की नाही यावर ३० दिवसात निर्णय होणार आहे. म्हणजेच ही प्रक्रिया ३ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. लटके यांना राजीनामा दिल्याशिवाय ही निवडणूक लढवता येणार नाही, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Join Our WhatsApp Community