कोविड काळात मुंबई महापालिकेने केलेल्या कामाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आल्याने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या पाठीवरही कौतुकाची थाप पडत असतानाच, आता त्यांना केंद्रीय सचिवपदी बढती मिळाली आहे. त्यामुळे आता केंद्रात बढती मिळाल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे लाडके असलेले चहल आता केंद्रात जाणार का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
केंद्र सरकारच्या कॅबिनेट अपॉईंटमेंट कमिटीने देशातील ९ ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची भारत सरकारच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजीव जलोटा आणि विद्यमान महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या नावाचा समावेश आहे. चहल यांनी याबाबत आनंद व्यक्त केला असून, सनदी अधिकाऱ्यांमध्ये ही बढती सर्वात महत्वाची मानली जाते.
(हेही वाचाः ‘छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरुन सांगतो, मी जे बोललो ते…’, वडिलांच्या प्रतिक्रियेवर संभाजी राजेंचं उत्तर)
कोविड काळातील कामाचे कौतुक
मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आल्यानंतर चहल हे प्रशासक म्हणून कामकाज सांभाळत आहेत. कोविड काळात त्यांनी केलेल्या कामाचेही कौतुक होत आहे. कोविड काळातील अनुभवाबाबत त्यांनी पुस्तक लिहिलेले असून, त्याचे प्रकाशन काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले होते.
मुख्यमंत्री चहल यांना सोडणार का?
चहल यांना केंद्रीय सचिवपदी बढती मिळाली असली, तरी केंद्रात जाणे किंवा न जाणे हे त्यांच्या हाती आहे. त्यामुळे राज्यात ठाकरे सरकारशी जवळीक असलेल्या चहल यांना केंद्रात जाणे आवडेल का? किंवा राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्याचे मुख्य सचिव त्यांना सोडणार का, असा प्रश्न आहे. काही महिन्यांपूर्वी बंगालमधील सनदी अधिकारी आलोपन बंदोपाध्याय यांना केंद्रीय सचिवपदी बढती देत प्रतिनियुक्तीवर नेमण्याचे आदेश मिळाले होते. परंतु त्यांना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोडले नाही. बंदोपाध्याय हे केंद्रात न जाता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
(हेही वाचाः मुंबईत तब्बल २६९ अनधिकृत शाळा: नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी)
शिवसेनेसाठी चहल महत्वाचे
त्यामुळे चहल यांना राज्य शासनाने न सोडल्यास त्यांना इथेच राहावे लागणार आहे. चहल यांचे महापालिकेत राहणे राज्य सरकारमधील शिवसेनेसाठी सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे चहल यांना ऐन निवडणुकीच्या काळात सोडणे शक्य नसल्याने चहल यांना बढती मिळाल्यानंतर केंद्रात जाता येईल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community