महापालिकेच्या निविदा आता शासनाच्या नियंत्रणाखाली

आजवर महापालिकेच्या निविदांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या मंत्रालयाने अखेर त्या आपल्या ताब्यात घेत, एकप्रकारे आपल्या नियंत्रणाखाली आणल्या आहेत.

85

मुंबई महापालिकेच्यावतीने मागवण्यात येणाऱ्या ई टेंडरींगमध्ये महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांसह महापालिकेचे काही अधिकारी छेडछाड करत, यातील गोपनीय माहिती काही कंत्राटदारांसाठी फोडत असल्याचा आरोप निनावी पत्राद्वारे करण्यात आला होता. त्यानंतर अखेर ही सॅप प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सॅप प्रणालीचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याने, महापालिकेमार्फत मागवल्या जाणाऱ्या निविदा या महाराष्ट्र शासनाच्या ई-निविदा प्रणालीवर मागवल्या जाणार आहेत. त्यामुळे आजवर महापालिकेच्या निविदांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या मंत्रालयाने अखेर त्या आपल्या ताब्यात घेत, एकप्रकारे आपल्या नियंत्रणाखाली आणल्या आहेत.

सॅप प्रणाली राहणार बंद

मुंबई महापालिकेच्या वापरात असलेली ‘सॅप मूलभूत’ प्रणाली आता ‘सॅप हाना’ या आवृत्‍तीमध्‍ये अद्ययावत करण्‍यात येणार आहे. या कामकाजासाठी सॅप मूलभूत प्रणाली ही ११ जून २०२१ रोजी रात्री ८ वाजल्यापासून २८ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. संपूर्ण सॅप प्रणाली बंद ठेवण्यात येणार असल्याने, या कालावधीत नागरिक व कर्मचारी सॅप प्रणालीवरील कोणतेही व्यवहार जसे की नागरी सुविधा केंद्रांमधील सेवा, कार्यादेश देणे, अधिदान करणे इत्यादी कामकाज करू शकणार नाहीत.

(हेही वाचाः निनावी पत्रामुळे महापालिकेतील कंत्राटदारांची उडाली झोप)

सर्वोत्तम सेवेसाठी होणार अद्ययावत

महापालिकेने नागरिक, कंत्राटदार तसेच महापालिका अधिकारी-कर्मचा-यांच्या विविध कामकाजासाठी सॅप या मुलभूत सॉफ्टवेअर प्रणालीचा अंगीकार केला आहे. सॅप प्रणाली अद्ययावत व सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच सर्वोत्‍तम सेवा देता यावी, यासाठी महापालिकेने ‘सॅप हाना’ या अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्‍वीकार करण्‍याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्‍या वापरात असलेली सॅप मूलभूत प्रणाली ही या नवीन व अद्ययावत अशा आवृत्‍तीमध्‍ये स्थलांतरित करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

सहकार्य करण्याचे आवाहन

महापालिकेमार्फत मागवल्या जाणा-या निविदा महाराष्ट्र शासनाच्या ई-टेंडरींग प्रणालीवर मागवल्या जाणार असल्याने निविदा प्रक्रिया देखील सुरू राहणार आहेत. उपरोक्त कालावधीमध्ये सॅप मूलभूत प्रणाली बंद राहणार असल्‍याने आवश्‍यक कामकाज त्‍वरित पूर्ण करुन मुंबईकर नागरिक, कंत्राटदार तसेच कर्मचारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

(हेही वाचाः महापालिकेने केले बंद, पण खासगी रुग्णालयात लसीकरणाला गर्दी)

आरोपानंतर झाला निर्णय

ई-निविदांमध्ये काही ठराविक कंत्राटदारांना माहिती व तंत्रज्ञान विभागातील कर्मचारी तसेच इतर विभागातील कर्मचारी सॅप प्रणालीमध्ये हस्तक्षेप करत असतात, अशाप्रकारचा आरोप निनावी पत्राद्वारे केला. त्यानंतर अशाप्रकारे निनावी पत्रांचा बॉम्बच पडल्यानंतर याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या चौकशीनंतरच या सॅप प्रणाली अद्ययावत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाने ज्याप्रकारे या प्रणालीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार निनावी पत्रांमधील तक्रार योग्य होती, असे एकप्रकारे प्रशासनाने मान्य केले आहे. मात्र, महापालिकेची सॅप प्रणाली बंद करण्यात आल्याने महापालिकेच्या निविदा आता शासनाच्या ई-निविदेद्वारे काढल्या जाणार असून, एकप्रकारे या निविदा राज्य शासनाच्या नियंत्रणाखालीच राहणार आहेत.

‘सॅप हाना’मध्ये काय असेल?

सॅप हाना या नवीन प्रणालीमध्ये दस्तऐवज साठवण्याची सुविधा, नवीन अॅप्लिकेशन्स अधिक जलदरित्या तपासून, कार्यान्वित करणे, अधिक जलद वेगाने प्रक्र‍िया करणे, नवीन यूजर इंटरफेस, अधिक प्रतिसादात्मक व वापरण्यास सुलभ मोबाईल अॅप्लिकेशन्स आणि विविध प्रकारचे डॅशबोर्ड उपलब्ध आहेत.

(हेही वाचाः महापालिका मलबार हिलकडील झाडांचे आरोग्य तपासणार!)

महापालिकेच्या प्रणाली व्यतिरिक्त या सेवा राहणार सुरू

मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी https://ptaxportal.mcgm.gov.in, जलदेयकांचा भरणा करण्याकरिता https://aquaptax.mcgm.gov.in, ऑनलाईन इमारत बांधकाम परवानगी अर्जासाठी https://autodcr.mcgm.gov.in ही संकेतस्‍थळं सुरू राहणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.