शाळा बंद, पण शिक्षण चालू अशी संकल्पना मांडून ऑनलाईन शिक्षणाचे धडे महापालिकेच्या शाळांमधूनही सुरू करणाऱ्या शिक्षणाधिकारी महेश पालकर यांना पुन्हा कार्यमुक्त करत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पुन्हा शासनाकडे पाठवले आहे. त्यामुळे प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांचा भार राजू तडवी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आता शासनाच्या शिक्षण विभागातून कोणा अधिकाऱ्याची या पदावर वर्णी लागते? या पदावर पुन्हा महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकारी प्रभारी म्हणून शिक्षण विभागाची धुरा पुढे नेतात का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
शिक्षण विभागासमोर आव्हान
मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांना ७ जुलै २०२१ रोजी पाच वर्षे पूर्ण झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले. त्यामुळे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी तात्काळ त्यांना कार्यमुक्त करत, परत शासनाकडे पाठवले आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीच शिक्षण विभागाचा भार अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवला होता. सहआयुक्त आशुतोष सलिल यांच्याकडे शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाचे सचिव म्हणून भिडे यांनी काम पाहिलेले असल्याने, त्यांच्याकडून महापालिकेच्या शिक्षण विभागातील आमूलाग्र बदलाची अपेक्षा बाळगली जात आहे. परंतु पदभार हाती घेताच शिक्षणाधिकारी यांना कार्यमुक्त करत पुन्हा शासनात पाठवल्याने पालकर यांनी जे बदल केले होते, ते आता पुढे कायम राखण्याचे एक आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.
शिक्षण विभागात झाले बदल
शिक्षणाधिकारी पदाचा भार स्वीकारल्यानंतर अनेक महत्वाचे निर्णय घेत शिक्षण विभागात बदल झाले. सध्या महापालिका शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण दिले जात असून, गरीब मुलांना हे शिक्षण मिळावे, म्हणून विविध संस्थांच्या मदतीने मोबाईल फोन उपलब्ध करुन दिले. त्यामुळे आज ७० ते ७५ टक्के मुले ही ऑनलाईन पध्दतीने शिक्षणाशी जोडली गेली आहेत. याशिवाय महापालिका शाळांमधील ज्या मुलांना लिहिता, वाचता येत नव्हते, त्यांच्यासाठी निकष लावत सुधारणा करतानाच मुलांचा गुणवत्तेचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला. तसेच शिक्षकांना प्रशासकीय कामांमधून मुक्त केले, याशिवाय विभागांना भेटी देत पर्यवेक्षीय यंत्रणा मजबूत केली. मराठी शाळांना लागलेली गळती कमी करण्यासाठी सेमी इंग्रजीच्या शाळा, तसेच शाळांचे नामकरण मुंबई पब्लिक स्कूल करणे तसेच सीबीएसई आणि आयसीएसई शाळा सुरु करण्याचेही महत्वाकांक्षी निर्णय त्यांनी घेतले होते.
कांदिवलीतील सर्व शाळांमध्ये गणेश नगर शाळा अव्वल
शाळा बंद, पण शिक्षण चालू या शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्या संकल्पनेनुसार महापालिका शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. त्याअंतर्गत मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलनही ऑनलाईन पध्दतीनेच घेण्यात आले. महापालिकेचे आर-दक्षिण विभागातील(कांदिवलीतील) महापालिकेच्या सर्व शाळांमधून आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात गणेश नगर महापालिका शाळेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. या शाळेने मुलांकडून विविध कला तसेच पथनाट्य सादर करत त्यांचे व्हिडिओ ऑनलाईन सादर केले होते. या वार्षिक स्नेहसंमेलनात उप शिक्षणाधिकारी सुजाता खरे, अधिक्षक अशोक मिश्रा, शारिरीक शिक्षण विभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक घाडगे तसेच आर दक्षिण विभागाच्या प्रशासकीत अधिकारी कल्पना संख्ये इत्यादी मान्यवरांनी ऑनलाईन वार्षिक स्नेहसंमेलनात सहभाग नोंदवला होता. सर्व विषयाच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्यी प्रात्यक्षिक दाखवली गेली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन शिक्षिका रुपाली बारी यांनी केले. तर शाळेत चालणारे विविध उपक्रम व शाळेविषयी माहिती संगीता भंडे या शिक्षिकेने दिली. या सर्व ऑनलाईन कार्यक्रमाची पडद्यामागची सादरीकरणाची जबाबदारी विक्रम सिंग यांनी पार पाडली. त्यामुळे गणेश नगर शाळा संकुलला यंदाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा प्रथम क्रमांक विजेता म्हणून घोषित करण्यात आले.
Join Our WhatsApp Community