मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ए विभागामध्ये अनुसूचित जाती महिला या प्रवर्गाऐवजी सर्वसाधारण महिला असे प्रभागाचे आरक्षण पडले. तर उर्वरीत दोन प्रभागांचे आरक्षण हे महिला व खुला प्रवर्ग अशाप्रकारे अदला बदली झाले आहे. मात्र, तिन्ही प्रभागांच्या आरक्षणावर नजर टाकल्यास मागील निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या सुजाता सानप आणि भाजपचे मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर यांचे वॉर्ड शाबूत आहेत. एकाच कुटुंबात दोन नगरसेवक असल्याने वॉर्डांची अदलाबदल होऊन दोघांनाही पुन्हा निवडणूक लढण्याचा मार्ग खुला झाला आहे.
…म्हणून सानप यांना संधी नाही
सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत जुना प्रभाग क्रमांक २२५ हा एस.सी.महिला आरक्षित झाला होता. जो आता नवीन प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक २३४ म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सानप यांनी आपल्या वहिनीला निवडणूक रिंगणात उतरवून निवडून आणले होते. परंतु नव्या प्रभाग आरक्षणात हा प्रभाग महिला झाल्याने, सुजाता सानप यांना पुन्हा संधी चालून आली आहे. हा प्रभाग जर खुला झाला असता, तर गणेश सानप हे इच्छुक असते आणि त्यांनी निवडणूक लढवली असती. परंतु आरक्षणाने गणेश सानप यांचा घात केला असून, पुन्हा एकदा त्यांना वहिनीला निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.
मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याने कुलाब्यातील प्रभाग क्रमांक २२६ व प्रभाग क्रमांक २२७ हे अनुक्रमे महिला व खुला प्रवर्ग आरक्षित होते, तिथे नार्वेकर कुटुंबातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या ऍड. मकरंद नार्वेकर आणि त्यांच्या वाहिनी हर्षिता नार्वेकर यांनी निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसच्या ताब्यात असलेले हे प्रभाग भाजपने आपल्या ताब्यात घेतले होते.
नार्वेकर कुटुंबांचेच वर्चस्व
नव्या प्रभाग रचनेत हे दोन्ही प्रभाग २३५ आणि २३६ म्हणून ओळखले जात असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत नेमके उलटे आरक्षण पडले आहे. त्यामुळे हर्षिता नार्वेकर यांना महिला आरक्षित झाल्याने २३६ प्रभागात जावे लागेल आणि मकरंद नार्वेकर यांना २३६मधून २३५मध्ये येत निवडणूक लढवावी लागणार आहे. मात्र, दोन्ही प्रभागांवर नार्वेकर कुटुंबांचे वर्चस्व असल्याने प्रभाग अदलाबदली करून निवडणूक लढवण्यास त्यांना कोणतीही अडचण येणार नाही,असे दिसून येत आहे. नार्वेकर यांचे बंधू हे कुलाबा विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आल्याने या मतदार संघावर भाजप आणि पर्यायाने नार्वेकर कुटुंबांचेच वर्चस्व असल्याचे म्हटले जाते.
( हेही वाचा: Bmc election 2022 mulund T Ward;शिवसेनेला नामोहरम करणाऱ्या सोमय्यांचा मुलगा बसणार घरी; सोमय्यांच्या घरातून आता निवडणूक लढवणार कोण? )
- प्रभाग २२५, एस.सी. महिला, सुजाता सानप(शिवसेना), नवीन प्रभाग २३४, (महिला आरक्षित)
- नवीन प्रभाग रचना :फोर्ट, ताजमहल हॉटेल, गेटवे ऑफ इंडिया, कर्नाक रोड नाक्यापासून आत्माराम नारायण सावंत मार्गापर्यंत, हुतात्मा चौक, वीर नरिमन रोड, वासुदेव बळवंत चौक
- प्रभाग २२६, महिला, हर्षिता नार्वेकर (भाजप), नवीन प्रभाग २३५, (खुला प्रवर्ग)
- नवीन प्रभाग रचना : नरिमन पॉईंट, मच्छिमार नगर, गणेश मूर्ती नगरपासून कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग,नाथालाल पारेख मार्ग
- प्रभाग २२७, ख्रुला प्रवर्ग मकरंद नार्वेकर (भाजप), नवीन प्रभाग २३६, (महिला आरक्षित)
- नवीन प्रभाग रचना : कुलाबा गीता नगर, अफगाण चर्च, नेव्हीनगर, नाथालाल पारेख मार्ग व बेस्ट मार्गाच्या नाक्यापासून कुलाबा कॉजवे पर्यंत
- सन २०१७च्या निवडणुकीतील आरक्षण : एस सी महिला, १ महिला व १ खुला प्रवर्ग
- सन २०२२च्या निवडणुकीतील आरक्षण: दोन महिला व एक खुला प्रवर्ग