Bmc election : प्रभाग आरक्षणाबाबत काँग्रेस, समाजवादी पक्षाची न्यायालयात जाण्याचा इशारा

126

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीबाबत काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवत, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी कुणाच्यातरी सांगण्यानुसार काँग्रेस पक्षावर अन्याय केला असल्याचा आरोप केला.त्यामुळे प्रत्येक नगरसेवक वैयक्तिक हरकती व सूचना नोंदवणार असून या व्यतिरिक्त काँग्रेस पक्ष या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्ट केले. काँग्रेस सोबत समाजवादी पक्षानेही आरक्षण प्रक्रियेविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे.

( हेही वाचा : मध्य रेल्वे मार्गावर सलग ३ दिवस मेगाब्लॉक)

या विरोधात न्यायालयात जाणार

मुंबई महापालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत मागील मंगळवारी पार पडली असून या आरक्षण सोडतीविरोधातच काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. यावेळी भाई जगताप यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणाबाबत काही दाखले देत ज्याठिकाणी ही लोकसंख्या अधिक तिथे हे आरक्षण पडता, जिथे कमी आहे तिथे हे आरक्षण पडले असल्याचे सांगितले. दक्षिण मुंबईत ३० पैकी २१ प्रभागांमध्ये महिलांचे आरक्षण पडले असून केवळ २३ प्रभागांचीच लॉटरी सोडत काढण्यात आल्याने आयुक्तांनी काँग्रेसबाबत पूर्णपणे पूर्वग्रहदुषित ठेवूनच ही सोडतीची प्रक्रिया राबवल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या सहा जूनपर्यंत हरकती सूचना नोंदवायच्या असल्याने त्यानंतर आपण या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

आम्ही लढण्यास तयार

तर समाजावादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनीही या विराधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ २३ जागांची सोडत काढण्यात आल्याने ही प्रक्रियाच चुकीची असल्याने या विरोधात आपण न्यायालया आव्हान देणार असल्याचे रईस शेख यांनी म्हटले आहे.

तर भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी निवडणूक आयोगाने नियमानुसार प्रक्रिया राबवली असल्याने जो काही निर्णय आला आहे, त्यानुसार आम्ही लढण्यास तयार आहोत. पण प्रभाग रचनेमध्ये शिवसेनेने आपल्याला अभिप्रेत अशाप्रकारे प्रभार रचना केली होती. त्यावेळी काँग्रेस पक्ष शांत बसून राहिला. परंतु आता त्यांचे प्रभाग महिला झाल्याने ते विरोधात आवाज उठवत आहे. जर त्यांनी प्रभाग रचनेविरोधात आवाज उठवला असता तर योग्य ठरले असते,असे शिरसाट म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.