सांगा कसं निवडून यायचं?

124

सांगा कसं जगायचं, हा संवाद आपण अनेक चालता फिरताना ऐकायलाच असेल. चित्रपट, नाटकांमधूनही हा संवाद थेट काळजालाच हात घालतो. पण नवीन संवाद कानी पडतो तो म्हणतो सांगा कसं निवडून यायचं ते. . .मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडल्याने प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांची चिंतेत अधिकच भर पडत असून केलेली कामे लोकांच्या विस्मृतीत जात असल्याने लांबणीर पडणाऱ्या निवडणुकीमुळे सांगा कसं निवडून येणार आम्ही अशी खंत आता प्रत्येक नगरसेवक व्यक्त करताना दिसत आहे.

( हेही वाचा : आयकराच्या सखोल चौकशीची भीती कुणाला? )

निवडणुकीत कसे निवडून यायचे?

मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक मागील फेब्रुवारी महिन्यांमध्ये होणे अपेक्षित होते, परंतु महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडल्याने ७ मार्च रोजी महापालिकेची मुदत संपल्यानंतर सर्व नगरसेवक आता घरी बसले आहेत. परंतु प्रत्येक माजी नगरसेवकाला आणि इच्छुक उमेदवारांना प्रतीक्षा आहे ती निवडणुकीची. मागील पाच वर्षांमध्ये जे जीव ओतून विभागाच्या विकासकामांसाठी मेहनत घेऊन काम केले, त्या कामांवर लांबणीवर पडलेल्या निवडणुकीमध्ये पाणी फेरले जात असल्याची प्रतिक्रिया आता माजी नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लांबणीवर पडलेल्या या निवडणुकीमुळे येत्या निवडणुकीत कसे निवडून यायचे हाच प्रश्न प्रत्येक नगरसेवकाला सतावत आहे.

सध्या महापालिकेत प्रशासकाची नियुक्त करण्यात आल्याने माजी नगरसेवकांना अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे माजी नगरसेवही हवालदिल झाले असून निवडणुकीचे आरक्षणही जाहीर झाले नसल्याने विद्यमान प्रभागात लक्ष घालायचे की आजुबाजूच्या प्रभागात लक्ष घालायचे या विचारातच ते पडले आहे. मागील निवडणुकीत ८४ नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ९८ पर्यंत पोहोचली होती, तर भाजपच्या नगरसेवकांची संख्या ८३पर्यंत होती, तर काँग्रेसचे २९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ०८ व सपाचे सहा नगरसेवक आहेत.

प्रथमच निवडणूक लांबणीवर

मागील पंचवीस वर्षांपासून शिवसेनेची महापालिकेवर सत्ता असल्याने यंदा प्रथमच निवडणूक लांबणीवर पडल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांच्याच पोटात भीतीचा अधिक गोळा आहे. शिवसेनेच्या काही नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, जर निवडणूक लांबणीवर पडणार होती, तर राज्यात आपलेच सरकार असल्याने याला मुदतवाढ देता आली असती. परंतु मुदतवाढीचा विचार न करता पक्षप्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासक नेमणूकीचा निर्णय घेऊन एकप्रकारे पाच वर्षे केलेल्या चांगल्या कामांवर पाणी फेरले आहे. लोकांची स्मरणशक्ती आता फारची अल्प आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत या कामांना ते विसरणार आणि याचा परिणाम आम्ही केलेल्या विकासकामांवर होणार आहे,असे सेना नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत उभे राहिल्यानंतर जो आत्मविश्वास यापूर्वी होता, तो आता दिसून येत नाही, परिणामी जिंकू की हरु हे जरी सांगणे कठीण असले तरी ही निवडणूक शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी तेवढी सोपी नाही,असेही त्यांचे म्हणणे आहे.

अधिक मेहनत करावी लागणार

भाजपच्या नगरसेवकांच्या मते, आम्ही प्रथमपासून पहारेकरी तथा विरोधक म्हणून काम केले आहे. त्यामुळे निवडणूक त्वरीत झाली असती तर त्याचा निश्चितच फायदा आम्हाला झाला असता, परंतु लांबणीवर पडल्याने आम्हाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. सत्ताधार पक्षाने २५ वर्षांत काहीही केले नाही आणि भ्रष्टाचार व घोटाळ्यांसह जे प्रताप बाहेर पडत आहेत, त्याचा निश्चितच फायदा विरोध पक्ष म्हणून आम्हाला होईल. परंतु लांबणीवर पडलेल्या निवडणुकीमुळे नगरसेवकापेक्षा अधिक जबाबदारी वाढल्याचेही ते सांगतात.

काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार प्रशासकाच्या नेमणुकीचा निर्णय हा चुकलेला असून याचा फटका शिवसेनेसोबत राज्यातील आघाडी सरकारमधील घटक पक्ष म्हणून आम्हालाही होईल. त्यामुळे राज्यात सत्तेवर राहून आम्हाला सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलता येणार नसल्याने सध्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची अवस्था तोंड बंद करून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखी अवस्था असल्याचेही बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.