सेनेच्या मुंबई महापालिकेत परप्रांतीय कंत्राटदाराला झुकते माप, मराठी कंत्राटदार प्रतीक्षेत!

मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा आश्रय योजनेतंर्गत पुनर्विकास करण्यासाठी शहरातील १२ वसाहतींचे काम हे ठाणे महापालिकेतील कंत्राटदार कंपनी शायोन कार्पोरेशन कंपनीला बहाल केले.

84

सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेतंर्गत करण्यात यावा, याकरता एकमेव निविदाकार असलेल्या कंपनीला नियम बदलून काम देण्याचा प्रयत्न झाला. तसा आरोप यासंबंधीच्या प्रस्तावावर झाला होता. शुक्रवारी, ९ जुलै रोजी तोच प्रस्ताव भाजपच्या विरोधानंतरही शिवसेनेने काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केला. यामाध्यमातून सत्ताधारी शिवसेनेने एका बाजुला ठाण्यातील कंत्राटदाराचा मार्ग मोकळा करतानाच दुसऱ्या बाजुला मराठी कंत्राटदाराला दारातच तिष्ठत उभे ठेवले आहे. माहिममधील कासारवाडी आणि प्रभादेवी येथील कामगार वसाहतीच्या पुनर्विकासासाठी बी.जी. शिर्के ही कंपनी पात्र ठरली असून त्यांचा प्रस्ताव समिती अध्यक्षांनी राखून ठेवला आहे.

निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक झालीच नाही! 

मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा आश्रय योजनेतंर्गत पुनर्विकास करण्यासाठी शहरातील १२ वसाहतींचे काम हे ठाणे महापालिकेतील कंत्राटदार कंपनी शायोन कार्पोरेशन कंपनीला बहाल केले. विशेष म्हणजे निविदेमध्ये किमान तीन कंपन्यांनी सहभाग घेवून स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया होणे आवश्यक असते. परंतु तसे न करता एकमेव कंपनीला सुमारे १६०० कोटी रुपयांचे काम देण्याचा घाट घातला आहे. याबाबत ‘हिंदुस्थान पोस्ट’ने ठाणे महापालिकेतील कंत्राटदाराला मुंबईने दिले भरभरुन अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर या कंत्राट कामाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.

(हेही वाचा : ऑक्सिजन प्लांटसाठी आधी काढल्या निविदा, नंतर उभारले सीएसआर निधीतून!)

भाजपचा विरोध!

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीच्या २३ जून रोजीच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवरील विषय क्र. ३८,३९, व ४० या प्रस्तावांत अनेक अनियमितता व कंत्राटदारास फायदा मिळण्याच्या दृष्टीने झुकते माप देण्यासाठीच या निविदा बनवण्यात आल्याची शंका व्यक्त केली होती. ठराविक कंत्राटदारास कंत्राट मिळावे यासाठी सर्व उपद्व्याप करताना महानगरपालिकेच्या तिजोरीवर भुर्दंड पडल्याचीही शंका त्यांनी व्यक्त केली. प्रस्ताव क्र. ३८ व ४० मध्ये एकमात्र निविदा प्राप्त झाली आहे. प्रचलित धोरणानुसार एकमेव निविदा प्राप्त झाल्यास पुन:र्निविदा मागवण्यात यावी अशी कंत्राटाविषयी केंद्रीय दक्षता आयोगाची मार्गदर्शक तत्वे आहेत. परंतु  या प्रस्तावांत अशी कार्यवाही  उपप्रमुख अभियंता (आश्रय योजना कक्ष) यांचेमार्फत करण्यात आली नाही. विषय क्र.३८ व ४० या दोन्ही निविदांमध्ये एकमेव निविदाकार असल्यामुळे स्पर्धा झालीच नाही, तरीही मे. शायोना कॉर्पोरेशन या एकमेव निविदाकारास कंत्राट बहाल करण्याकरिता पुन:र्निविदा मागवण्यात का आली नाही, असाही सवाल त्यांनी केला होता.

मराठी कंत्राटदार बी.जी. शिर्केंचा प्रस्ताव राखून ठेवला!

तर भाजपचे महापालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांनी आश्रय योजनेतंर्गत स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी सादर केलेल्या तिन्ही प्रस्तावांमध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे जवळपास एक हजार कोटींचा फरक असून अंदाजित बांधकाम क्षेत्रफळ आणि कंत्राटदाराने  नमुद केलेले क्षेत्रफळ यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे हा एक हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप विनोद मिश्रा यांनी  केला होता. त्यामुळे हे प्रस्ताव दप्तरी दाखल करून या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी मिश्रा केली होती. परंतु आजवर हे प्रस्ताव राखून ठेवले जात असताना दक्षिण मुंबईतील १२ पुनर्विकासाची कामे शायोन कार्पोरेशन कंपनीला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आले. यावेळी प्रस्ताव मंजुरीसाठी घेण्यात आलेल्या मतदानात विरोधी पक्षातील काँग्रेस, सपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रस्तावाच्या बाजुने मतदान करत सत्ताधारी शिवसेनेला हा प्रस्ताव मंजूर करण्यात मदत केली. दक्षिण मुंबईतील या १२ कामांचे प्रस्ताव मंजूर केले असले मराठी कंत्राटदार असलेल्या बी. जी. शिर्के हे ज्या पुनर्विकास कामांसाठी पात्र ठरले होते, त्या कासारवाडी व प्रभादेवी इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव राखून ठेवण्यात आले आहे.

(हेही वाचा : मुंबईतील उद्यान, मैदानांची विकासकामे आता प्राधान्य क्रमानुसारच!)

सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचे मंजूर केलेले प्रस्ताव 

गट क्रमांक ३

  • गौतम नगर टप्पा २ (३०० चौ.फूट :  ६९० सदनिका, ६०० चौ. फुट : १७३ सदनिका )
  • शीव सरदार नगर इमा.ए१/ए२(३०० चौ.फूट : ११४ सदनिका,)
  • कल्पक प्लॉट (३०० चौ.फूट : १६७ सदनिका,)
  • शीव कोळीवाडा रावळी कॅम्प (३०० चौ.फूट : २०० सदनिका,)
  • ना.म. जोशी मार्ग (३०० चौ.फूट : ८८ सदनिका,)
  • माहिम प्लॉट (३०० चौ.फूट :  ४०८ सदनिका, ६०० चौ. फुट : १४४ सदनिका )
  • शिश महल (३०० चौ.फूट : ४६० सदनिका,)

३०० चौरस फुटाच्या एकूण सदनिका : २१३४

६०० चौरस फुटाच्या एकूण सदनिका : ३१७

पात्र कंत्राटदार कंपनी : शायोना कॉर्पोरेशन कंपनी

पुनर्विकासाचा कंत्राट खर्च : ७०४ कोटी आणि विविवध करांसह एकूण ९२९.२६ कोटी रुपये

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.