कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावत अंधेरी, मुलुंडमधील तरण तलावांचे खासगीकरण?

अंधेरी, मुलुंड येथील क्रीडा संकुलाचे खाजगीकरण झाल्यास यांचे दर सामान्य नागरिकांना परवडणार नाही आणि येथील दरवाजे सर्वसामान्य जनतेला कायमचे बंद होण्याची भीती वर्तवली जात आहे.

122

मुंबई महापालिकेच्या अंधेरी आणि मुलुंडमधील क्रीडा संकुलातील ज्या सुविधा आणि जागा पडीक स्वरूपात असतील त्यांचे आऊटसोर्सिंग करावे अशा प्रकारच्या सूचना असतानाही बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्यावतीने नफ्यात चाललेल्या तरण तलावाचे खासगीकरण करण्याचा डाव आहे. प्रतिष्ठानच्यावतीने तरण तलाव खासगी संस्थेला चालवण्यास देत याचे खासगीकरण केले जाणार आहे. त्यामुळे आजवर याठिकाणी सर्वसामान्य जनतेला प्रवेश मिळत असला तरी भविष्यात हे तरण तलाव धनदांडग्यांचा घशात घालण्याचा कुटील डाव रचला जात आहे. याचे खासगीकरण करताना प्रतिष्ठानमधील सुमारे १००हून अधिक कामगार, कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचे कामही सत्ताधारी शिवसेनेकडून केले जात आहे.

मुळात तरण तलाव आणि बॅटमिंटन कोर्टची जागा कुणाला द्यायची हे ठरलेले असून अभिरुची स्वारस्य अर्ज ही केवळ औपचारिकता आहे. जर आपण येथील सर्व गोष्टींचे खासगीकरण करणार असू तर या प्रतिष्ठानची गरज काय? या प्रतिष्ठानमधील गैरव्यवहारानंतर आणि या खासगीकरणामुळे येथील विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी यापूर्वीच केलेली आहे. जर येथील तरण तलाव खासगी संस्थेला दिल्यास सध्या जे काही ७ हजार रुपयांची फी आहे, ती दुप्पट होणार आहे. तसेच हे खासगीकरण केल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय असून जर कामगारांना ठेवले जाणार नसेल तर या प्रतिष्ठानची गरज नाही. ते त्वरीत बरखास्त करायलाच हवे.
– प्रकाश गंगाधरे, नगरसेवक, भाजप

कोविड काळात बंद होते क्रीडा संकुल! 

सामान्य मुंबईकराला रास्त आणि माफक दरात सुविधा प्राप्त व्हाव्यात याकरता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानची स्थापना केली होती. या प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील कालिदास नाट्यगृह आणि तरण तलावाच्या क्रीडा संकुलाचा तसेच अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाचा कारभार आणला. मात्र, या प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी महापौर आणि उपाध्यक्षपदी आयुक्त आहेत, तर सदस्य म्हणून विरोधी पक्षनेत्यांसह सर्व पक्षांचे गटनेते आदी असून त्यांच्या वर्चस्वाखाली या प्रतिष्ठानचा कारभार केला जातो. परंतु यावर महापालिकेचे नियंत्रण असते. परंतु कोविड काळात क्रीडा संकुल बंद असल्याने प्रतिष्ठान आर्थिक संकटात असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना एकूण पगार न देता सरसकट दहा हजार रुपये एवढाच पगार दिला जात आहे. याबाबत महापालिका स्थायी समिती व महापालिका सभागृहात भाजप गटनेते प्रभाकर शिंदे तसेच सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी आवाज उठवल्यानंतरही येथील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. याबाबत आढावा घेताना अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी ज्या सुविधा आणि जागा पडीक स्वरूपात असतील त्यांचे आऊटसोर्सिंग करावे व ज्या सुरु आहेत, त्या महापालिकेच्यावतीने सुरु ठेवाव्यात. अशाप्रकारच्या सूचना केल्या असताना प्रतिष्ठानवर नियुक्त झालेले विशेष कार्य अधिकारी देवेंद्र कुमार जैन यांनी अंधेरी व मुलुंडमधील तरण तलाव व बॅटमिंटन कोर्ट ही खासगी संस्थांच्या घशात घालण्यासाठी असतानाही अभिरुची स्वारस्य अर्ज मागवले आहेत. यामध्ये तरण तलाव त्या संबंधित संस्थांना चालवण्यास दिले जाणार आहेत.

(हेही वाचा : युवा सेनेला राष्ट्रवादीचा खांदा… कोण आहे ‘हा’ नेता?)

…तर क्रीडा प्रतिष्ठान केवळ श्रीमंतांनाच परवडतील!

मागील ५ वर्षांपासून प्रतिष्ठानच्या सेवांचे दर वाढवण्यात आलेले नाहीत. आजही तरण तलावाचे वार्षिक शुल्क हे प्रौढांसाठी ७००० रुपये आणि लहान मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक रुपये ३५०० एवढे आहे. परंतु खाजगीकरण झाल्यास यांचे दर सामान्य नागरिकांना परवडणारे नसतील. आणि येथील दरवाजे सर्वसामान्य जनतेला बंद होण्याची भीती वर्तवली जात आहे. प्रतिष्ठानचे विशेष कार्य अधिकारी देवेंद्र जैन हे महापौरांचेही विशेष कार्य अधिकारीही आहेत. परंतु त्यांनी नफ्यात चालणारे तरण तलावाच्या सुविधा धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा कुटील डाव महापौरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आखलेला आहे. विशेष म्हणजे अभिरुची स्वारस्य अर्ज मागवलेले आहेत, त्यातील अटी लक्षात घेता येथील कामगार व कर्मचाऱ्यांनाही देशोधडीला लावण्याचा डाव असल्याचे उघड होत आहे. या अटीमध्ये कर्मचाऱ्यांच्या योग्य मूल्यांकनानंतर सहभागी विद्यमान कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाईल,असे नमुद केले आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या पोटावर लाथ मारली जाण्याची शक्यता असून हे सर्व कर्मचारी मराठी आहेत. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र कुमार जैन हे  प्रतिष्ठान तोट्यात असल्याचे दाखवून महापौर किशोरी पेडणेकर आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना खोटी माहिती देवून प्रतिष्ठान धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा डाव आखत आहेत. त्यासाठी त्यांनी २० टक्के कमिशनवर एका सल्लागाराची नियुक्तीही केली आहे. अतिरिक्त आयुक्तांना खरी माहिती न देता नफ्यात चालवले जाणारे तरण तलाव खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याचा घाट घातल्याचे बोलले जात आहे. आदेश बांदेकर हे व्यवस्थापकीय विश्वस्त असेपर्यंत येथील कारभार चांगल्या प्रकारे चालत असल्याचेही कर्मचारी बोलत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.