खड्ड्यांबाबत आयुक्तांची तारीख पे तारीख

१५ दिवसांपूर्वी खड्डे बुजवण्यासाठी संयुक्त पथके तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतरही आता महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी पुढील २ ते ३ आठवडे प्राधान्याने कामे करावीत, असे सक्त निर्देश दिले आहेत.

मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा आयुक्तांकडून तारीख तारीख जाहीर केली जात आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे जनता त्रस्त असून नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचीही दखल महापालिका प्रशासनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांकडून त्यांच्या भागातील खड्ड्यांबाबत आलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेवून ते बुजवण्यात यावेत, असे निर्देश राज्याचे पर्यावरणमंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ जुलै २०२१ रोजी दिल्यानंतरही मुंबईतील रस्त्यांवर खड्डे समस्या कायमच आहे. १५ दिवसांपूर्वी खड्डे बुजवण्यासाठी संयुक्त पथके तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतरही आता महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी पुढील २ ते ३ आठवडे प्राधान्याने कामे करावीत, असे सक्त निर्देश दिले आहेत.

एप्रिल २०२१ पासून ४० हजाराहून अधिक खड्डे बुजवले! 

मुंबई महानगरातील रस्त्यांवर पावसाळ्यामुळे निर्माण झालेले खड्डे आणि पावसाळी साथ आजारांच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजना या संदर्भात महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंगळवारी आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्यासह सर्व संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सर्व सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी आयुक्तांनी, मुंबई महानगरात एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत सर्व रस्त्यांवर मिळून ४० हजार पेक्षा जास्त खड्डे बुजविण्याची कामगिरी प्रशासनाने केली आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून सतत सुरु असलेला पाऊस आणि रस्त्यांवर वाढलेली वाहतूक यामुळे खड्डे निर्माण होण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. त्यामुळे युद्ध पातळीवर खड्डे बुजविण्याची कार्यवाही सर्व प्रशासकीय विभाग कार्यालये आणि रस्ते विभाग यांनी संयुक्तपणे सुरु करावी. निदर्शनास आलेला खड्डा शक्यतो त्याच दिवशी भरण्यात यावा, अशा सूचना केल्या. मुंबईतील यंदाचा पाऊस सुमारे ३ हजार मिलीमीटर पर्यंत पोहाचला असून मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरु आहे. टाळेबंदी शिथील केल्यानंतर रस्त्यांवरील वाहतूक देखील वाढली आहे. असे असले तरी कोणतीही सबब पुढे न करता, रस्त्यांवर निदर्शनास येणारे खड्डे बुजवून योग्यरित्या रस्ते परिरक्षीत करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे, असे चहल यांनी नमूद केले आहे.

(हेही वाचा : मुंबै बँकेची बदनामी करणाऱ्यांविरोधात १ हजार कोटींचा दावा!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here