पुन्हा चायनामधूनच अनेस्थेशिया मशिन्सची खरेदी : अडकणार का वादात?

105

मुंबई महापालिकेच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या भूल यंत्रात अर्थात इंटिग्रेटेड अनेस्थेशिया मशिन्समधील भ्रष्टाचाराची चौकशी झाल्यानंतर आता यांची रक्कम कमी होऊ लागली आहे. या खरेदीतील घोटाळ्यानंतर २०१८-१९मध्ये खरेदी केलेल्या भूल यंत्र ही निम्म्या किंमतीत प्राप्त झाली होती. या ५४ मशिन्सनंतर आता महापालिका प्रशासन विविध रुग्णालयांसाठी ५१ मशिन्सची खरेदी करण्यात येत आहे. यामध्येही आता महापालिकेच्या अंदाजापेक्षा २१ टक्के कमी दराने आणि मागील वेळी खरेदी केलेल्या दरापेक्षा ४३.५६ टक्के दराने कमी बोली लावत हे काम मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे कोविड काळात मास्क आणि सॅनिटायझरचा पुरवठा करणारी कंपनी आता महापालिकेला भूल यंत्रांचा पुरवठा करणार आहे.

५१ भूल यंत्रांची खरेदी करण्यात येत आहे

रुग्णांना शस्त्रक्रियेच्यावेळी भूल देण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये वापर केल्या जाणाऱ्या मिडियम एंड अनेस्थेशिया वर्क स्टेशनची खरेदी करण्यात येत आहे. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये आणि प्रसुतीगृहांसाठी ५१ भूल यंत्रांची खेरदी केली जात आहे. या यंत्राचा पुरवठा, उभारणी व चाचणी करता तीन वर्षांच्या हमी कालावधीनंतर पुढील पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटासह या ५१ भूल यंत्रांची खरेदी करण्यात येत आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये श्रध्दा डिस्ट्रीब्युटरर्स ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीने या एका भूल यंत्रासाठी १२ लाख ८८ हजार ४०४ रुपये तसेच पाच वर्षांच्या देखभाल कंत्राटासाठी २ लाख ४९ हजार ७४५ रुपयांसह विविध आकार यांसह एकूण १६ लाख ३० हजार ८८० रुपयांमध्ये या भूल यंत्राचा पुरवठा करण्यासह दर निश्चित केला आहे.

८ कोटी ४ लाख ८३ हजार ६१० रुपये खर्च केले जाणार

या भूल यंत्रासाठी महापालिकेने १५ लाख ७६ हजार २६० रुपयांसह पाच वर्षांच्या देखभाल व आकारांसह १९ लाख ७० हजार रुपये एवढा दर अंदाजित केला होता. त्या तुलनेत २१ टक्के दर कमी लावून काम मिळवण्याचा प्रयत्न झाला आहे. हे भूल यंत्र चायनातील शेनजेन कोमेन मेडिकल इन्स्ट्रुमेंट कंपनी लिमिटेड यांच्याकडून खरेदी केले जाणार आहे. यासाठी एकूण ८ कोटी ४ लाख ८३ हजार ६१० रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे ही यंत्रे आयात करताना जो काही आवश्यक कर आणि भौतिक सादीलवार आकारला जाणार आहे, त्याची भरणा ही महापालिकेच्या मार्फत केला जाईल, असे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे कंत्राटदाराने दर कमी आकारला असला तरी त्यावरील कराची रक्कम महापालिकेच्या तिजोरीतून खर्च केली जाणार आहे.

(हेही वाचा कॉ. गोविंद पानसरे हत्याकांड : ७ वर्षे झाली तरीही तपास सुरूच! काय आहे गौडबंगाल?)

चौकशी अहवाल पुढे दाबून ठेवण्यात आला

सन २०१५-१६मध्ये महापालिकेने ५१ इंटीग्रेटेड अनेस्थेशिया मशिन्सची खरेदी केली होती. यामध्ये कंत्राटदाराने ३१ मशिन्स या चीनमधून तर उर्वरीत मशिन्सचा पुरवठा युपीतूनच केला होता. या भूल यंत्रातील खरेदीतील भ्रष्टाचार उघडीस आल्यानंतर तत्कालिन उपायुक्त राम धस यांची चौकशी समिती बसवून याची चौकशी करण्यात आली होती. याबाबतचा चौकशी अहवाल पुढे दाबून ठेवण्यात आला होता. त्यानंतर मागील २०१८-१९ मध्ये महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसहित इतर रुग्णालयांमध्ये या ५४ भूल यंत्रांची खरेदी करण्यात आली होती. या एका भूल यंत्राची किंमत २० लाख रुपये महापालिकेने अंदाजित केली होती, तर त्याच्या पुरवठ्यासाठी ४ लाख १५ हजार रुपये, अशाप्रकारे या यंत्राची किंमत २४ लाख १५ हजारांच्या घरात जात असून पाच वर्षांच्या देखभालीसाठी त्यावर ९ लाख ६६ हजार रुपये खर्च अशा प्रकारे एकूण प्रति यंत्रासाठी ३३ लाख ८१ हजार रुपये एवढा दर महापालिकेने निश्चित करून त्याप्रमाणे खरेदी करण्यासाठी निविदा मागवली होती. परंतु यासाठी पात्र ठरलेल्या कंत्राटदाराने हे यंत्र सर्व खर्च गृहीत धरून १४ लाख ३३ हजार रुपयांमध्ये देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामध्ये विप्रो जीई हेल्थकेअर या कंपनीने महापालिकेच्या अंदाजित रकमेपेक्षा तब्बल ५८ टक्के दर कमी लावून हे काम मिळवले होते.

अंदाजापेक्षा २१ टक्के कमी दराने खरेदी केली जात

ही सर्व भूल यंत्रे चायना उत्पादित होती आणि मुलभूत कस्टम ड्युटी, शैक्षणिक कर, आयजीएसटी व बँकेच्या सोडवणुकीचा आकार या सर्वांचा खर्च गृहीत धरून यावर ७.९९ कोटी रुपये खर्च केला गेला आहे. विशेष म्हणजे इंटिग्रेटेड अॅनेस्थेशिया मशिनचा पुरवठा यापूर्वी महापालिकेच्या अंदाजापेक्षा ३५ टक्के अधिक बोली लावून करण्यात आली होती. त्यातुलनेत नंतर ५४ या भूल यंत्राचा पुरवठा करताना ५८ टक्के कमी बोली लावून केली गेली आणि आता ही यंत्रे मागील खरेदीच्या ४३ टक्के कमी दराने आणि महापालिकेच्या अंदाजापेक्षा २१ टक्के कमी दराने खरेदी केली जात आहे.

(हेही वाचा मुंबईत ३६ कोटींमध्ये काळ्याचे पांढरे!)

तीन वर्षांपूर्वी या रुग्णालयांना देण्यात आली होती भूल यंत्रे

  • केईएम रुग्णालय : ११
  • नायर रुग्णालय : ०७
  • डॉ.कुपर रुग्णालय : ०८
  • नायर दंत रुग्णालय : २
  • ई.एन.टी.रुग्णालय : २
  • उपनगरीय रुग्णालये : २२
  • जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालय : २

आता या रुग्णालयांना देण्यात येणार भूल यंत्रे

  • शीव रुग्णालय : १९
  • नायर रुग्णालय : १५
  • कूपर रुग्णालय : ०८
  • कार्यकारी आरोग्य अधिकारी : ०९
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.