मालाडमध्ये जनावरांसाठी कोंडवाडा, दवाखान्यांचीही सुविधा

132

मालाडमधील वलनाई गावातील आरक्षित भूखंडावर महापालिकेच्यावतीने गुरांच्या कोंडवाडयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. आजारी जनावरांसाठी दवाखाना तसेच बकऱ्या व शेळ्यांसाठी दोन छप्पर उभारुन बांधकाम करण्यात करण्यात येणार आहे. महापालिकेच्यावतीने यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली असून यासाठी साडे दहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

गुरांचे गोठे निर्माण करणार

देवनार कत्तलखान्याचे महाव्यवस्थापक असलेले दिवंगत डॉ. योगेश शेट्ये यांनी मालाडमधील भूखंडावर गुरांच्या कोंडवाड्याचे बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेतला होता. या कोंडवाड्यामध्ये गावामध्ये गुरांचे पालन कशाप्रकारे केले जाते, त्यांची काळजी कशी घेतली, तसेच शेण आणि त्यांच्या मुत्रांपासून कोणकोणते फायदे आहेत, हे भावी पिढीला कळावे यासाठी चांगल्या दर्जाचे कोंडवाडे अर्थात गुरांचे गोठे निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. परंतु त्यांचे हे प्रयत्न आता पुढे मार्गी लागले आहेत.

(हेही वाचा आयजीच्या जिवावर बायजी उदार: महापौरांना स्मशानभूमीच्या उद्घाटनासाठी मिळाला वेळ, पण…)

आजारी जनावरे रस्त्यावर मोकाट 

मुंबईत अनेक भटकी जनावरे रस्त्यावर फिरत असल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होतो. त्यामुळे या भटक्या जनावरांना पकडून महापालिकेच्या माध्यमातून कोंडवाड्यात पाठवले जातात. त्यामुळे बऱ्याचदा पकडून आणलेल्या जनावरांना मालक दंडाची रक्कम भरुन सोडवून नेतात. तर अनेक मालक हे जनावरे आजारी पडली की त्यांना रस्त्यावर मोकाट सोडून देतात. त्यामुळे अशा आजारी जनावरांना पकडून आणल्यावर महापालिकेच्यावतीने उपचारही केले जातात. यामध्ये बऱ्याचदा गाय, बैल, म्हैस, गाढव, बकरी आदींचा समावेश असतो.

१० कोटी ६६ लाखांचा खर्च करण्यात येणार

महापालिकेच्या नगर अभियंता विभगाच्या माध्यमातून मालाड पश्चिम येथील वलनाई गाव येथील भूखंडावर पशुपालन कार्यालय, गुरांच्या कोंडवाड्याचे बांधकाम केले जाणार आहे. यामध्ये तळ मजल्यावर दोन मजल्यांचे कार्यालय तसेच दवाखान्याकरता इमारत, आजारी जनावरांसाठी एक छप्पर, औषध व चाऱ्यांकरता दोन छप्पर, बकऱ्या व शेळ्यांकरता एक छप्पर आणि जनावरांसाठी पाण्याची टाकी यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये रिध्दी एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली असून त्यांना विविध करांसह १० कोटी ६६ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. या गोंडवाड्यांमध्ये मुलांच्या सहली आयोजित करून गुरांचे पालनपोषण कशाप्रकारे केले जाते याची माहिती देण्याच्या विचारातून या कोंडवाड्याचे बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.