छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे पूर्वी असमतल असल्यामुळे तिथे धुळीमुळे प्रदुषण होत असे व स्थानिक रहिवाशांना फुप्फुसांच्या आजारांचा सामना करावा लागत असे. तसेच पावसाळ्यात मैदानातील खाचखळग्यांमध्ये पाणी साचल्याने खेळाडूंना विविध खेळ खेळण्यास अडथळा निर्माण होत होता. याकरीता, छत्रपती शिवाजी महाराज मैदान समतल करून मैदानामध्ये मातीचा भराव टाकून त्यावर हिरवळ तयार करत धुळीचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे यासाठी पुढील तीन वर्षांच्या देखभालीकरता कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु हे कंत्राटच महापालिकेने रद्द करत ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. मैदानावर हिरवळ राखण्यासाठी वर्षाला एक कोटी रुपये खर्च करण्याची आवश्यकता नसून बाहेरील कंत्राटी कामगारांची मदत घेऊन मैदानावर पाणी मारत हिरवळ राखण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवाजी पार्क) या मैदानातील धुळीमुळे आसपासच्या इमारतीतील रहिवाशी त्रस्त असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी मैदानाच्या परिसरात हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. महापालिका जी/उत्तर विभागाच्या माध्यमातून मैदानाच्या भागात गवताळ परिसर निर्माण करण्यासाठी विहिरी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून रिचार्ज करत हे मैदान धुळमुक्त करण्यात आले आहे. या मैदानातील रेनवॉटरसह पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे गवताळ भाग तयार करण्यात आल्याने एप्रिल आणि मेपर्यंत संपूर्ण शिवाजी पार्क परिसरातील गवत चांगल्याप्रकारे वाढत जाणार आहे. या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात नव्याने होणारी हिरवळ व माती टिकून राहावी, संपूर्ण परिसराचे स्वच्छता योग्य प्रकारे व्हावी, नव्याने दुरुस्त करून बसवण्यात आलेली तुषार सिंचन प्रणाली सतत कार्यान्वित राहावे व नागरिकांच्या इतर कोणत्याही प्रकारच्या मैदानासंबंधीच्या समस्या तत्काळ सोडवता याव्यात याकरिता छत्रपती शिवाजी महाराज पार्क चे परिरक्षण व साफसफाई करण्यासाठीचे तीन वर्षाचे कंत्राट कामासाठी निविदा मागवली होती.
त्यानुसार संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जमिनीखाली सछिद्र वाहिन्यांचे जाळे टाकले आहे. परिणामी, मैदान परिसरातील नव्याने तयार केलेल्या ३६ विहिरींमधून हिरवळीसाठी तसेच धूळ उडू नये यासाठी पाणी सिंचन केल्यानंतर त्याचा निचरा होऊन ते पुनश्च विहिरींमध्ये येण्यास मिळण्यास मदत होईल. यातून विहिरींचे पुनर्भरण होईल. ही सर्व कामे मैदानाची आंतरराष्ट्रीय दर्जानुसार निगा राखणारी, स्थानिक नागरिकांचा धूळीपासून बचाव करणारी आणि पर्यावरणपूरक आहेत. या कामांचे आराखडे (plans) जी – उत्तर कार्यालयात उपलब्ध आहेत. मुंबईकर नागरिक ते कधीही पाहू शकतात.
जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले. शिवाजी पार्कच्या देखभालीसाठी कधीही कंत्राटदाराची नेमणूक केली जात नव्हती. आजवर संबंधित क्लबच्या माध्यमातून त्या परिसराची देखभाल केली जायची. परंतु आता या मैदानावर हरित पट्टा निर्माण केल्याने त्यांची निगा राखणेही आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून प्रशासकांच्या मंजुरीनंतर येत्या १ जूनपासून या कामाला सुरुवात होणार आहे.
यामध्ये १२ माळी आणि १२ सफाई कामगारांचा समावेश असेल. शिवाय कोणतेही कार्यक्रम तसेच मेळाव्या दरम्यान मैदानांवर खड्डे निर्माण झाल्यास ते बुजवून मैदानाचा भाग समतल करण्याचा प्रयत्न संबंधित कंत्राटदाराकडून केला जाणार आहे. या कंत्राटात मैदानाला पाणी मारणे, पंप सुरु करणे तसेच मैदान परिसराची स्वच्छता राखण्यासह विविध कार्यक्रम व सभांच्या आयोजनानंतर तेथे स्वच्छता राखण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर असेल. ज्याद्वारे शिवाजी पार्क मैदानाची योगयप्रकारे देखभाल होईल आणि हिरवळ कायम राखण्यात मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community