राजकीय सोयींसाठीच सहायक आयुक्तांच्या बदल्या!

ऐन पावसाळ्यात सहायक आयुक्तांची हलवाहलवी करत प्रशासनाने बसलेली घडीच विस्कळीत करून टाकली आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरलेली नाही, दुसरीकडे पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून मुंबई जलमय होत आहे. मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण होत असतानाच महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सहा सहायक आयुक्तांची बदली केली. पावसाळ्यात अशाप्रकारे सहायक आयुक्तांच्या बदल्या करून आयुक्तांनी इतिहासात नोंद केली. विशेष कोविड काळातील या आणीबाणीच्या प्रसंगी कोणत्याही सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात येणार नाही, असा निर्धार करणाऱ्या प्रशासनाने पावसाळ्यात या बदल्या मुंबईच्या सोयीसाठी केल्या की राजकीय सोयीसाठी, असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.

पावसाळा तोंडावर आहे. अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. दरडी कोसळून दुघर्टना घडत आहेत. असे असताना आयुक्तांनी सहायक आयुक्तांच्या बदल्या करत एकप्रकारे बसलेली घडी विस्कळीत केली. कोरोना गेलेलाच नाही. लसींचा भोंगळ कारभार सुरु आहे. त्यामुळे बदल्या करायची ही वेळ नव्हती. कधीही पावसाळ्यात अशाप्रकारच्या बदल्या झालेल्या नाही आणि कोरोनासारखी आणिबाणीची स्थिती असताना या बदल्या करायचीही गरज नव्हती. या बदल्यांमध्ये प्रशासकीय गलथानपणाच अधिक असून या बदल्या मुंबईच्या सोयीसाठी केल्या गेल्या की राजकीय सोयीसाठी केल्या गेल्या?
– प्रभाकर शिंदे, गटनेते, भाजप महापालिका

पावसाळ्यात सह आयुक्तांच्या बदल्यांमुळे गोंधळ!

मुंबई महापालिकेच्या सहा सहायक आयुक्त यांच्या बदल्या तसेच चार कार्यकारी अभियंत्यांना सहायक आयुक्तपदावर बढती देण्यात आली. परंतु तीन वर्षांहून अधिक काळ लोटल्याने या बदल्या केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ऐन पावसाळ्यात या बदल्या केल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मार्च २०२०पासून कोविडच्या आजाराचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर त्या विभागातील या आजारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न एक कर्णधार म्हणून सहायक आयुक्तांनी केले. त्यामुळे कोरोनाच्या काळात त्यांनी केलेले काम तसेच पावसाळ्यातील निर्माण होणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर विभागाचा आपत्कालिन आराखड्यानुसार काम करण्याचा प्रयत्न सहायक आयुक्तांकडून होत असते. तसेच दरड कोसळण्याच्या दुघर्टनातही वाढ होऊ लागली. त्यामुळे ऐन पावसाळ्यात सहायक आयुक्तांची हलवाहलवी करत प्रशासनाने बसलेली घडीच विस्कळीत करून टाकली आहे. म्हणून नवीन अधिकाऱ्याला विभागातील आपत्कालिन व्यवस्थापनाचा आराखडाच माहित नसल्याने अनेक सहायक आयुक्तांचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक भागातील तुंबणाऱ्या पाण्यामुळे एकच गोंधळ उडाला. आधीच विभागाची भौगोलिक परिस्थिती माहित नाही, त्यातच पाणी तुंबल्याने त्यांचा मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे जे काम आजवर कधीही पावसाळ्यात झाले नव्हते, ते काम करत आयुक्तांनी आपल्या नावावर इतिहास रचतच गोंधळ उडवून दिला आहे.

(हेही वाचा : फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या चौकशीचा अहवाल सादर)

कुर्ल्यातील परिस्थितीची जबाबदारी कोण घेणार?

कुर्ला एल विभागाचे सहायक आयुक्त मनिष वळंजु यांची बदली करत याच विभागाचे कार्यकारी हरिनारायण साहू यांना बढती देत त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. परंतु एल विभागाचे क्षेत्रफळ मोठे असतानाही कार्यकारी अभियंत्याला बढती देत त्यांच्यावर जबाबदारी सोपवल्याने कुर्ल्यातील नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. ऐन पावसाळ्यात कोणत्याही सहायक आयुक्तांच्या तसेच अधिकाऱ्यांच्या बदल्या करता येत नाही. दुसरीकडे कुर्ल्यात मिठी नदीला पूर येवून पाणी तुंबले जात आहे. दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. असे असताना सहायक आयुक्तांची बदली का करण्यात आली, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी केला आहे. त्यामुळे जर भविष्यात कुर्ला परिसरात पूरपरिस्थिती येवून अथवा अन्य प्रकारच्या दुघर्टना घडल्यास त्याला महापालिका आयुक्त जबाबदार असतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

आजवर पावसाळ्यात कधीही अशाप्रकारे बदल्या झालेल्या नाहीत. अनेक सहायक आयुक्तांचा तीन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झालेला होता. पण् कोविडमुळे त्यांच्या बदल्या होवू शकल्या नाहीत. त्यामुळे खांदेपालट करण्यासाठी या बदल्या झाल्या असल्या तरी कोरोना आणि पावसाळा आदींचा विचार करून बदलीचा निर्णय घ्यायला हवा होता. एल विभागाला एखाद्या सक्षम सहायक आयुक्तांची गरज आहे. पण तिथे जर कार्यकारी अभियंत्यावर जबाबदारी टाकली तर ते कसे जमेल?
– रवी राजा, विरोधी पक्षनेते, महापालिका

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here