पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून करण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर यासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. १५ ते १८ वयोगटातील सुमारे ९ लाख मुले असून या सर्वांसाठी महाविद्यालयांमध्ये तसेच महापालिका लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाईल. त्यामुळे मुलांसाठी दोन्ही पर्याय खुले असून जर शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी महाविद्यालयांमध्येच जागा उपलब्ध झाल्यास त्याठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.
…तर लसीकरण करण्याचा मार्ग सुकर होईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी रात्री राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केली. या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाच्या प्रारंभ ३ जानेवारी २०२२ पासून होईल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी केंलेल्या घोषणेनंतर मुंबईत याची अंमलबजावणीही केली जाणार असून यासाठी महापालिका सज्ज असल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. मुंबईत महापालिकेसह खासगी लसीकरण केंद्र सुरु आहेत. महापालिकेच्या माध्यमातून ३ जानेवारीलाच लसीकरण केले जाणार आहे. पण लसीकरण हे उपलब्ध होणाऱ्या लसींवर अवलंबून असेल. जर जास्त प्रमाणात मिळाल्यास जास्त संख्येने लसीकरण होईल.
(हेही वाचा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर?)
१५ ते १८ वयोगटातील सुमारे ९ लाख मुले मुंबईत
सध्या जी कनिष्ठ महाविद्यालय आहेत, त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या संपर्कात आहोत. महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाचे सहकार्य लाभल्यास आणि मुलांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केल्यास लसीकरण करण्याचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे ज्या महाविद्यालयांमध्ये लसीकरणासाठी पुरेशी विद्यार्थी असतील तिथे महापालिकेचे पथक पाठवून अथवा मोबाईल व्हॅन पाठवून लसीकरण केले जाईल. महापालिकेने या वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा आराखडा आधीच तयार केला होता. १५ ते १८ वयोगटातील सुमारे ९ लाख मुले मुंबईत असून महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन ते अडीच लाख एवढी आहे. त्यामुळे ३ जानेवारीपासून मुंबईत लसीकरण सुरु करण्याची मानसिकता आहेतच. फक्त याबाबतच्या मार्गदर्शक धोरणाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे याचे शेड्युल्ड प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे दोन दिवसांमध्ये त्याचे प्रशिक्षण नर्सेस आदींना देवून हे लसीकरण केले जाईल,असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community