आता नगरसेवक निधीतून मिळणार नाही १० लिटर कचऱ्याचे डबे!

२०१६मध्ये प्रथम ३ लाख कचरा पेट्यांची खरेदी करून प्रथम ओला व सुका कचऱ्यासाठी दोन स्वतंत्र डब्याचे वाटप विभागातील नागरिकांना करण्यात आले होते.

118

घरोघरी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण होऊन ओला व सुका कचरा वेगळा ठेवता यावा, यासाठी घराघरांमध्ये दोन स्वतंत्र कचऱ्याचे डबे देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार नगरसेवक निधीतून दोन डबे देण्याचा निर्णय घेऊनही प्रत्यक्षात नगरसेवकांनी मात्र प्रत्येक कुटुंबांना केवळ एकच डबा दिल्याने ही योजनाच फसली गेली. पाच वर्षांपूर्वी राबवलेली ही योजना गुंडाळण्यात येत असून यापुढे नगरसेवक निधीतून १० लिटर क्षमतेचे व २४० लिटर क्षमतेच्या डबे खरेदी करून त्यांचे वाटप केले जाणार नाही. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी महापालिकेने या डब्यांची केलेली खरेदी ही नियमबाह्य असल्याचेही बोलले जात आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेला निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. यानुसार नगरसेवक निधीतून १० लिटर क्षमतेचे कचऱ्याचे डबे खरेदी करण्याचे घनकचरा व्यवस्थापन ठरविले. यासाठी २०१६मध्ये यासाठी प्रथम ३ लाख कचरा पेट्यांची खरेदी करून प्रथम ओला व सुका कचऱ्यासाठी दोन स्वतंत्र डब्याचे वाटप विभागातील नागरिकांना करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येकी सरासरी साडे चार हजार डबे देण्यात निश्चित करून त्याप्रमाणे नगरसेवकांना हे डबे वाटण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. परंतु नगरसेवकांना देण्यात आलेल्या या डब्यातील प्रत्येक कुटुंबाला ओला व सुका कचरा यासाठी दोन स्वतंत्र डबे देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात दोन डबे न देता केवळ एकाच डब्याचे वाटप नगसेवकांनी घरोघरी जाऊन केले होते.

(हेही वाचा : गोवंश नामशेष करण्यासाठी बैलगाडा शर्यतीवर बंदी! आमदार पडळकरांचा गंभीर आरोप)

नगरसेवक निधीतून केवळ १२० लिटर क्षमतेच्याच कचरा पेट्यांची खरेदी

आधीच नगरसेवक निधीतून या कचरा पेट्यांची खरेदी करता येत नसतानाही जबरदस्तीने याचा समावेश करण्यात आला. त्यानुसार १० लिटर, १२० लिटर आणि २४० लिटर क्षमता अशाप्रकारे कचरा पेट्यांची खरेदी नगरसेवक निधीतून करता येत होती. १२० लिटर व २४० लिटर क्षमतेच्या कचरा पेट्या या इमारती व सोसायट्यांना वितरीत केल्या जात होत्या. परंतु यापैकी १० लिटर व २४० लिटर क्षमतेच्या कचरा पेट्यांची खरेदी यापुढे नगरसेवक निधीतून खरेदी न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापुढे नगरसेवक निधीतून केवळ १२० लिटर क्षमतेच्याच कचरा पेट्यांची खरेदी केली जाणार आहे. नगरसेवक निधीतून यापूर्वी दिलेल्या १० लिटर क्षमतेच्या कचरा पेट्यांची जोडी काही नगरसेवकांनी न देता एकेक डब्यांचेच वाटप केले. त्यामुळे एकप्रकारे नगरसेवकांकडून जनतेची तसेच महापालिकेचीही फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. तर काही नागरिकांनी या डब्यांचा वापर कचऱ्याऐवजी धान्य व पाणी साठवून ठेवण्यासाठी केले. त्यामुळे याचा हेतू साध्य न झाल्याने नगरसेवक निधीतून या कचरा पेट्या खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.