दादरच्या धर्मशाळेतील ‘ते’ बांधकाम अनधिकृत : महापालिकेने चालवला बुलडोझर!

हे बांधकाम तोडून जनतेला सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे मस्तवाल सहायक आयुक्ताचा मी निषेध करतो, असे माहिम-दादर विधानसभेचे आमदार सदा सरवणकर म्हणाले.

162

दादर चैत्यभूमी येथील भागोजी किर स्मशानभूमीतील विधी कार्यशाळेच्या नुतनीकरण करण्यात येत असलेल्या बांधकामावर महापालिकेने हातोडा चालवला. आमदार निधीतून हे अनधिकृत बांधकाम करण्यात येत होते. त्यामुळे याबाबतच्या तक्रारीनंतर म्हाडाला कल्पना देवूनही त्यांनी हे बांधकाम स्वत:हून न तोडल्याने शु्क्रवारी महापालिकेने तोडले. या धर्मशाळेत मृत व्यक्तीचे पुढील विधी कार्य पार पाडली जातात आणि वाढत्या गर्दीमुळे हे बांधकाम करण्यात येत होते. परंतु  शिवसेनेनेतील स्थानिक राजकारणामुळे तक्रारीचे कारण पुढे करत यावर हातोडा चालवला गेल्याची जोरदार चर्चा आहे.

स्थानिक शिवसेना आमदाराला धक्का!

परिसरातील या विधी हॉलची दुरवस्था झाल्याने स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी या धर्मशाळेचे नुतनीकरण करण्यास जिल्हा नियोजन विकास कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे वास्तूमधील तळ मजल्यावरील काम  पूर्ण झाले होते. दुरुस्तीच्या नावावर या धर्मशाळेचे तळ अधिक एक मजला बांधकाम वाढवण्यात आले होते. त्यामुळे याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी याची पाहणी केली. यामध्ये याठिकाणी तळ अधिक एक मजल्याचे आरसीसीचे ३० फुटाचे पक्के बांधकाम केल्याचे आढळून आले. त्यामुळे २६ मार्च २०२१ रोजी जयस्वाल यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांना पत्र लिहून या बांधकामासाठी सीआरझेड, पर्यावरण विभाग, महापालिका इमारत प्रस्ताव अशा कोणत्याही यंत्रणांची एनओसी घेतली नाही. तसेच या विधी हॉलच्या वाढलेल्या बांधकामामुळे चैत्यभूमीची वास्तू झाकली जात आहे. त्यामुळे ते त्वरीत पाडण्यात यावेत, असे कळवले होते. परंतु वारंवार कळवूनही म्हाडाने कोणतीही कारवाई न केल्याने अखेर अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार जी उत्तर विभागाने शुक्रवारी ही कारवाई करत हे बांधकाम तोडले.

येथील विधी कार्यशाळेच्या जागी तळ मजला अधिक एक मजल्याचे बांधकाम करण्यात आले होते. म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या बांधकामासाठी सीआरझेड तसेच महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाची परवानगी नव्हती. याबाबत तक्रारी येत होत्या. त्यामुळे म्हाडाशी पत्रव्यहार करून त्यावर त्वरीत कारवाई करण्याची सूचना अतिरिक्त आयुक्तांनी केली होती. पण आठ दिवसांनंतरही त्यांनी यावर कारवाई न केल्यामुळे शुक्रवारी त्या बांधकामावर कारवाई करण्यात आली.
– किरण दिघावकर, सहायक आयुक्त, जी उत्तर विभाग

विशेष म्हणजे राज्यात आणि मुंबई महापालिकेत शिवसेनेचे सरकार आणि सत्ता आहे. आजवर अशाप्रकारे जनतेकरता बांधकाम करण्यात आले आहे. आणि त्यावर महापालिकेनेही दुर्लक्ष केले होते. परंतु स्थानिक शिवसेनेतील अंतर्गत राजकारणामुळेच हे बांधकाम तोडायला लावत स्थानिक शिवसेना आमदाराला एक मोठा धक्का दिला गेल्याचे म्हटले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह तत्कालिन महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा हर्षला आशिष मोरे यांचीही तक्रार होती. मोरे या शिवसेना पक्षाच्या असून त्यांच्याकडून झालेली तक्रार ही  विचार करायला लावणारी आहे.

(हेही वाचा : मुंबईत शुक्रवारी ३३ हजार ५५१ लोकांचे लसीकरण)

शिवसेनेच्या स्थानिक राजकारणामुळे शह काटशह सुरु!

सध्या माहिम व दादर विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेत अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. शिवाजी पार्कचे नुतनीकरण करून तेथील गवत हरित राखण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी टाकणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणे आदींची माहितीही सरवणकर यांना दिली जात नाही. आमदार आणि त्या भागातील काही मोजकेचे नगरसेवक व पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे या वास्तूवर हातोडा चालवला गेल्याचे बोलले जात आहे. या मतदार संघात आता सरवणकर यांच्या विरोधात एक मोठी लॉबी तयार केली जात आहे. त्यामुळे त्यांना शह देण्यासाठीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाब आणत ही कारवाई केल्याचीही चर्चा विभागात ऐकायला मिळत आहे.

लोकांच्या मागणीनुसारच नुतनीकरण – आमदार सदा सरवणकर

चैत्यभूमी परिसरातील भागोजी किर स्मशानभूमीतील ही कार्यशाळा  १२५ वर्षांपूर्वीची आहे. या कार्यशाळेत मृत्यूपश्चात करण्यात येणारी दहावे तसेच तेराव्याची कार्य केली जातात. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून तसेच मुंबई बाहेरील अनेक मृतांचे नातेवाईक अंतिम विधीसाठी याठिकाणी येत असतात. त्यामुळे याठिकाणी होणारी गर्दी आणि लोकांची होणारी गैरसोय तसेच लोकांची वाढती मागणी लक्षात घेता या कार्यशाळेचे नुतनीकरण म्हाडाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्यात येत होते. आमदार म्हणून मी करत होतो. त्यामुळे सध्याच्या कार्यशाळेचे जे बांधकाम आहे, त्यांची उंची लक्षात घेता, ३० ते ३५ फूट उंची राखत वाढवले होते. ते याचसाठी की जास्त लोक आले तर वरील भागात जावून विधीकार्य करतील. त्यात माझा काही वैयक्तीक स्वार्थ नव्हता. पण लोकांच्या तक्रारी असल्याचे सांगून हे बांधकाम महापालिकेने तोडले. जर लोकांच्या तक्रारी होत्या, तर मला कल्पना द्यायची होती. चर्चा करून तो मार्ग सोडवता आला असता. पण हे बांधकाम तोडून जे आपण लोकांसाठी सुविधा उपलब्ध करून देत होतो, त्यापासून जनतेला वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मस्तवाल सहायक आयुक्ताचा मी निषेध करतो, असे माहिम-दादर विधानसभेचे आमदार सदा सरवणकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.