मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात आल्याने नगरसेवकांचे महापालिका सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळे महापालिकेत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच वर्षे प्रशासनासोबत हातात हात घालून काम करणाऱ्या नरसेवकांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांचे महापालिकेतील महत्वही कमी झाले आहे. त्यामुळे प्रशासकीय राजवटीत नगरसेवकांना आता कुणी विचारेनासे झाले असून खुद्द महापौरांनाही आता याचा वाईट अनुभव आल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. महापौरपदावरून पायउतार होताच पेडणेकरांना त्यांची जागा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दाखवून दिली आहे. याची चर्चाच सध्या महापालिकेत सर्वत्र दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे.
माजी गटनेत्यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क
मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आल्यानंतर ८ मार्चपासून महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यामुळे महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरु झाली असून लोकप्रतिनिधींचा महापालिकेतील प्रत्यक्ष हस्तक्षेप संपला आहे. मात्र या प्रशासकाच्या नियुक्तीनंतर शिस्तीसाठी पहिली छडी महापौरांना दाखवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मागील सोमवारी महापालिकेतील सर्व माजी गटनेते हे प्रशासकांच्या भेटीसाठी दुपारी साडेतीनच्या सुमारास भेटण्यास गेले होते. सत्ताधारी पक्षाच्यावतीने सभागृह नेत्यांच्या संपर्क होत नसल्याने माजी गटनेत्यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला. परंतु आपण मुख्यालयातच असल्याचे सांगत त्यांनी आपण सर्व भेटू असे त्यांना सांगितले.
(हेही वाचा भाजप, महाविकास आघाडीची बेरीज-वजाबाकी; किती येणार, किती जाणार?)
माजी गटनेते दालनातून माघारी फिरले
त्यानंतर माजी गटनेत्यांसह माजी महापौर किशोरी पेडणेकर हे प्रशासक इक्बालसिंह चहल यांना भेटण्यास गेले होते. परंतु आज आपल्याकडे वेळ नसून लवकर बोला असे सांगत चहल यांनी उभे राहतच त्यांचे म्हणणे ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे काम झाल्यानंतर माजी गटनेते दालनातून माघारी फिरले. तोच किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यासोबत आलेल्या एका लोकप्रतिनिधींची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु चहल यांनी माझ्याकडे परवानगी न घेता यायचे नाही. परवानगी असेल तरच यायचे असे सांगत त्यांना माघारी परतरण्यास सांगितले. त्यामुळे आजवर आपल्या अधिकारावर प्रशासनाला नाचवणाऱ्या पेडणेकर या महापौर पदाच्या खुर्चीवरुन खाली उतरताच त्यांना त्यांची जागा दाखवण्याच्या घडलेल्या प्रकाराची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.
आयुक्त व महापौर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली
महापालिकेत मागील काही दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या सभेमध्ये अर्थसंकल्प मंजूर करताना आयुक्तांनी ६५० कोटी रुपयांच्या अंतर्गत निधीमध्ये फेरफार करण्यास मान्यता दिली होती. परंतु हा निधी स्थायी समितीला दिला असून महापालिका सभागृहाला अंतर्गत निधीत फेरफार करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणी महापौरपदी असताना पेडणेकर यांनी केली होती. त्यामुळे महापालिका सभागृहात अर्थसंकल्प मांडल्यानंतर पेडणेकर यांनी आयुक्तांना विनंती केली होती. परंतु आयुक्तांकडून याला प्रतिसाद दिला जात नसल्याने तसेच त्यांचे फोन उचलले जात नसल्याने महापालिकेची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी तीन ते चार दिवस अगोदर आयुक्त व महापौर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर खुद्द आयुक्त हे महापौरांच्या दालनात उपस्थित राहिले होते. त्यामुळे खुर्चीवर बसताना केलेल्या अपमानाचा बदला चहल यांनी घेतला नाही ना अशी कुजबुजही ऐकायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community