मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड प्रतिबंधक लसींची खरेदी करण्यासाठी जागतिक स्तरावर निविदा मागवण्यात आल्या. परंतु याला एकाही कंपनीने प्रतिसाद न दिल्यानंतर डॉ. रेड्डीज लॅबोटरीजशी चर्चा करून स्पुटनिक लस मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. परंतु डॉ. रेड्डीज यांनीही ही लस देण्यास तयारी न दर्शवल्यामुळे अखेर मुंबई महापालिकेने लस खरेदीचा हा प्रस्ताव गुंडाळून टाकला आहे. सध्या केंद्र सरकारकडून महापालिकेला पुरेसा लस साठा उपलब्ध होत असल्याने महापालिकेला ही खरेदी करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे महापालिकेचे लस खरेदीचे १ हजार कोटी रुपये वाचले आहेत.
छाननीनंतर एकही पुरवठादार पात्र ठरला नाही!
मुंबई महानगरपालिकेला कोविड लस पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने जागतिक स्तरावर १२ मे २०२१ रोजी स्वारस्य अभिव्यक्ती प्रकाशित केली. याला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच संभाव्य पुरवठादारांशी कागदपत्रे पूर्तता करण्याचे निर्देश देऊन दूरदृश्य प्रणालीद्वारे सातत्याने चर्चाही केली. विशेषतः लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस उत्पादीत करीत असलेल्या कंपन्या या दोहोंदरम्यान असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अत्यावश्यक होते. त्यानुसार छाननी केल्यानंतर संभाव्य ९ पुरवठादारांपैकी एकही पुरवठादार पात्र ठरला नाही.
(हेही वाचा : दहा दिवसांत तलावांत वाढला ५३ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा )
जून २०२१ अखेरपर्यंत स्पुटनिक देण्याची तयारी डॉ. रेड्डीजने दर्शविलेली
सर्व मुंबईकर नागरिकांना कोविड – १९ प्रतिबंधक लस देण्यासाठी पुढे आलेल्या ९ संभाव्य पुरवठादार संस्था तथा कंपन्या या कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी अपात्र ठरल्यानंतर महापालिका प्रशासनाने स्पुटनिक या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार, प्रायोगिक तत्वावर स्पुटनिक लसीचा काही प्रमाणात साठा मुंबई महानगरपालिकेला जून २०२१ अखेरपर्यंत देण्याची तयारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी दर्शविली होती. स्पुटनिक लसीच्या शीतगृहातील साठवणुकीचे निकष वेगळे आहेत. त्यामुळे हा साठा मिळाल्यानंतर त्याच्या शीतगृहातील साठवणुकीची चाचपणी करण्यात येणार होती. तसेच जुलै व ऑगस्ट २०२१ या दोन महिन्यांमध्ये स्पुटनिक लसीचा साठा मोठ्या प्रमाणात देण्याबाबतही डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती. याअनुषंगाने पुन्हा एकदा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यासमवेत चर्चा केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी प्रशासनाने स्पष्ट केले होते. परंतु डॉ. रेड्डीजकडूनही आता लस साठा मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे ज्या स्पुटनिकवर महापालिकेचा भरवसा होता, तिथेही आता त्यांना अपयश आले आहे. त्यामुळेच महापालिकेने लस खरेदीचा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवल्याची माहिती मिळत आहे.
केंद्राकडून पुरेसा लससाठा उपलब्ध
यापूर्वी राज्य सरकारने कोणताही प्रतिसाद न आल्याने लस खरेदीची निविदा प्रक्रीया गुंडाळल्यानंतर आता मुंबई महापालिकेलाही लस खरेदी करता आलेली नाही. त्यामुळे केंद्राकडून मिळणाऱ्या लसींच्या आधारेच लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. तसेच केंद्राकडूनही आता पुरेशा प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत असल्याने राज्याला आणि महापालिकेला लस खरेदी करण्याची गरज भासत नाही.
(हेही वाचा : मुंबईची एकूण रुग्णसंख्या घटली: ८ हजार रुग्ण बाहेरचे!)
Join Our WhatsApp Community