महापौर, आयुक्तांना पुरस्कारासाठी वेळ, पण सानुग्रह अनुदानावरील निर्णयासाठी नाही!

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रणित म्युनिसिपल कामगार सेनेला श्रेय मिळावे म्हणून महापौर आणि आयुक्त हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची वेळ मिळण्यासाठी हा निर्णय पुढे ढकलत आहेत का, असा सवाल कर्मचारी करत आहेत.

127

सर्व शासकीय आणि निम शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी भेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाली, तरी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या दिवाळी भेटीचा अजून काही पत्ता नाही, अद्याप घोषणा झाली नाही. सर्व कर्मचारी या सानुग्रह अनुदानाच्या घोषणेकडे डोळे लावून बसले आहेत. सालाबादप्रमाणे कर्मचाऱ्यांना ५०० रुपयांची वाढ देत १६ हजार रुपये देण्याची लेखा विभागाने तयारी करून ठेवली आहे. परंतु याची अधिकृत घोषणा करण्याकरता ना महापौर किशोरी पेडणेकर यांना सवड आहे, ना महापालिका आयुक्त यांना वेळ आहे.

दिवाळीला ४ दिवस शिल्लक तरी…

कोविड काळात महापालिकेच्या अत्यावश्यक आणि बिगर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी खांद्याला खांदा लावत कोविड निर्मूलनासाठी काम केले. ज्याच्या जोरावर आज महापौर आणि आयुक्त पुरस्कार स्वीकारत आहेत, त्याच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट द्यायची वेळ येताच महापौर आणि आयुक्त यांना वेळ मिळत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून आम्हाला भीक नको, तर आमच्या हक्काचे आम्हाला द्या, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मागील वर्षी ५०० रुपयांची वाढ करत महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपयांची दिवाळीभेट जाहीर केली होती. परंतु दिवाळीला अवघे चार दिवस शिल्लक असूनही अद्यापही सानुग्रह अनुदानाचा निर्णय झालेला नाही. दरवर्षी १५ ते २० दिवस आधी दिवाळी भेट संदर्भात निर्णय, तसेच घोषणा केली जाते. पण २९ ऑक्टोबरची तारीख उजाडली तरी याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या १ नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने दीपावलीला सुरुवात होत असून या सणाकरता खरेदीची लगबग सुरु झाली.

(हेही वाचा : राणी बाग सोमवारपासून खुली! कुणाला मिळणार प्रवेश?)

श्रेय लाटण्यासाठी घोषणा रखडली का? 

मागील दिवाळीमध्ये शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेनेने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली होती, त्यानंतर मुख्यमंत्री यांनी याबाबत गटनेत्यांच्या सभेत निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रणित म्युनिसिपल कामगार सेनेला श्रेय मिळावे म्हणून महापौर आणि आयुक्त हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची वेळ मिळण्यासाठी हा निर्णय पुढे ढकलत आहेत का, असा सवाल आता कर्मचारीच करू लागले आहेत. एरव्ही सर्व मुंबई भर फिरून विविध कार्यक्रमात भाग घेणाऱ्या महापौर सानुग्रह अनुदानाच्या निर्णयाबाबत बैठक घेण्यासाठी कुठल्या मुहूर्ताची वाट पहात आहेत, असाही सवाल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान, १६ हजार रुपये एवढी सानुग्रह अनुदानाची रक्कम गृहीत धरून लेखा विभागाने आपली सर्व कागदोपत्री तयारी करून ठेवली आहेत. आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर ही रक्कम आयकराची आणि कामगार संघटनांची फी कापून घेऊन कायम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.