महापौर किशोरी पेडणेकर या कालपर्यंत ज्या रंगाची साडी, त्या रंगाचा मास्क लावत असत. शुक्रवारी महापौरांच्या या रंगीबेरंगी मॅचिंग मास्कच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. माध्यमांनीही याविषयावर महापौरांवर प्रश्नाचा भडीमार केला, तेव्हा महापौरांनी त्यांचे समर्थन केले खरे, मात्र दुसऱ्या दिवशी शनिवारी मात्र महापौरांच्या तोंडावरचा हा रंगेबीरंगी मास्क गायब झाला आणि त्यांच्या तोंडावर एन ९५ प्रकारचा मास्क आला.
काय होते प्रकरण?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधीच मास्क विषयी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘कोणताही कापडी मास्क लावू नका, तीन लेयर असलेला मास्क किंवा एन ९५ प्रकारचा मास्क लावावा’, असे जनतेला आवाहन केले. त्यानंतर माध्यमांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामध्ये माध्यमांनी महापौरांना ‘जर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कापडी साधे मास्क वापरू नका, असे सांगत आहेत, तर मग तुम्ही कापडी मास्क का लावता’, अशी विचारणा केली, त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याचे समर्थन करताना म्हणाल्या की, ‘मी मास्क कापडी लावते, तो दररोज धूत असते, तसेच हा मास्क सर्वसामान्य वापरतात, त्यांना एन ९५ मास्क परवडत नाही, मी सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व करते म्हणून मी हा मास्क वापरते. तसेच मी एक स्त्री आहे, त्यामुळे साडीला मॅचिंग मास्क लावण्याचा मोह आवरता येत नाही’, असेही त्या म्हणाल्या.
(हेही वाचा मुंबई महापालिकेचा ५०० कोटींचा भूखंड घोटाळा!)
महापौरांच्या तोंडावर एन ९५ मास्क
शनिवारी, ८ जानेवारी रोजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सकाळीच बीकेसीतील कोविड सेंटरला भेट दिली. त्याचा आढावा घेतला, त्यावेळी महापौर पेडणेकर यांच्या तोंडावर चक्क एन ९५ मास्क लावलेला दिसून आला. त्यामुळे महापौरांनी रंगीबेरंगी आणि मॅचिंग मास्क लावण्याचा मोह आवरला का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Join Our WhatsApp Community