आयजीच्या जिवावर बायजी उदार: महापौरांना स्मशानभूमीच्या उद्घाटनासाठी मिळाला वेळ, पण…

88

बोरीवली पश्चिम येथील बाभई हिंदू स्मशानभूमीमधील नैसर्गिक वायू अर्थात पीएनजीवर आधारीत दाहिनीचे लोकार्पण शुक्रवारी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते पार पडले. बोरीवलीमधील या स्मशानभूमीसाठी स्थानिक नगरसेविका अंजली खेडकर आणि खासदार गोपाळ शेट्टी यांचे विशेष प्रयत्न आहेत. परंतु याचे उद्घाटन करायची वेळ आल्यानंतर महापौरांनी थेट बोरीवलीत धाव घेतली. ज्या वरळीमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन आई-वडील आणि त्यांची दोन लहान बालके भाजली आणि त्यांच्या उपचारात महापालिकेच्या रुग्णालयात हयगय झाली, हे अवघ्या जगाने पाहिले. परंतु त्या रुग्णांची विचारपूस करायला जाण्यासाठी महापौरांना तिसऱ्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. परंतु स्मशानभूमीच्या उद्घाटनासाठी त्यांनी बोरीवली गाठली. त्यामुळे महापौरांना रुग्णांचे जीव वाचवण्यात किंवा त्यांना वेळेवर उपचार मिळावे, ही धारणा नसून मृत्यू नंतरच्या सोयीसुविधा कशाप्रकारे मिळतील यातच त्यांना स्वारस्य असल्याचे यावरून दिसून येते.

स्मशानभूमीच्या संकुलात बहुउद्देशीय प्रकल्प सुरु

बोरिवली (पश्चिम) च्या शिंपोली येथील बाभई हिंदू स्मशानभूमीमधील नैसर्गिक वायू दाहिनीचे लोकार्पण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. स्मशानभूमीच्या संकुलात गेले अनेक वर्ष बहुउद्देशीय प्रकल्प सुरु आहे. यामध्ये शांतीधाम एक मजली आणि चार हजार चौरस फूट जागेत अतिशय सुंदर ध्यान मंदिर आहे. शेजारी शिवालय आहे. सोबत हिरवाईने नटलेली पर्यावरण पूरक वनराई आहे. स्मशानभूमी निर्मितीसाठी पाच कोटी रुपये इतका खर्च करण्यात आलेला आहे. या उद्घाटन प्रसंगी उप महापौर ऍड. सुहास वाडकर, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, आर/उत्तर व आर/मध्य प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, स्थानिक नगरसेविका अंजली खेडकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, बिना दोशी, नगरसेवक अमेय घोले, उपायुक्त (परिमंडळ -७) डॉ. भाग्यश्री कापसे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, आर /मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त वकार जावेद हाफिज उपस्थित होते.

(हेही वाचा होय, समाजप्रबोधक वीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर अनेकदा भेटले होतेच!)

विकासकामांचे भूमीपुजन करण्याची संधी शिवसेना सोडत नाही

मागील अनेक वर्षांपासून या स्मशानभूमीचे काम हे रखडलेले होते, ते पूर्ण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्न करत होते. आज जेव्हा ते उभे राहिले तेव्हा भाजपच्या प्रभागातील या विकास कामांवर महापौरांनी आपला हक्क सांगून त्यांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर या स्मशानभूमीच्या उद्घाटनासाठी दहिसरमधून शीतल म्हात्रे आणि वडाळ्यातून अमेय घोले हे उपस्थित होते. त्यामुळे भाजपच्या विभागांमध्ये कोणत्याही प्रकारच्या विकास कामांचे भूमीपुजन किंवा फित कापण्याची संधी शिवसेना सोडत नसून एक दिवस भाजपच्या प्रभागांमध्ये अधिक डोकावून पाहता पाहता स्वत:चा वॉर्ड हातचा गेलेला दिसेल, अशी मार्मिक प्रतिक्रिया नागरीकांकडून ऐकायला मिळत आहे.

महापौर केवळ सोयीच्याच ठिकाणी भेटी देतात

रुग्णांना चांगले उपचार मिळावे म्हणून महापौरांना रुग्णालयात जायला त्यांना वेळ नाही, परंतु स्मशानभूमीचे उद्घाटन करायला त्यांना वेळ मिळतो, हे निव्वळ राजकारण असून महापौर केवळ सोयीच्याच ठिकाणी भेटी देत असतात, असा आरोप भाजपचे उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी केला आहे. महापौर आणि शिवसेनेचा रुग्णसेवांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी कोणताही प्रयत्न नसून निवडणूक जवळ आल्याने दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय आपल्याकडे कसे मिळेल, याचाच प्रयत्न असतो. त्यातून बाभई येथील स्मशानभूमीचा उद्घाटनाचा प्रयत्न झाला आहे. स्वत: महापौरांनी, खासदार गोपाळ शेट्टी यांनी यासाठी केलेले प्रयत्न मान्य केले. जर खासदार आणि स्थानिक नगरसेविका अंजली खेडकर यांनी यासाठी प्रयत्न केले असतील तर त्या कामांचे उद्घाटन करायचा अधिकारही त्यांचाच आहे. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन हा सर्व प्रकार चालला आहे. हा प्रकार म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी सुभेदार’ यासारखा आहे. पण जनता सुज्ञ आहे, असे ते म्हणाले. महापौरांनी उद्घाटनाची वेळ सकाळी अकरा वाजता जाहीर केली होती, पण भाजपचे खासदार व पदाधिकारी तिथे वेळेवर पोहोचल्यानंतर त्या दुपारी दोन वाजता पोहोचल्या. यावरून त्यांना वेळेचे महत्व किती आहे, तेही स्पष्ट होते, असे खणकर म्हणाले. एका माजी उपमहापौर आणि विद्यमान खासदार यांना किती तिष्ठत ठेवायचे आणि उपायुक्त व इतर अधिकारीही वेळेवर उपस्थित राहू नये, ही खेदजनक बाब आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.