संपूर्ण मुंबईत केवळ वरळीचा होतोय विकास!

आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वरळी मॉडेल बनवण्याच्या दृष्टीकोनातून नागरी विकासकामांसह सुशोभिकरणावर भर देण्याची घोषणा केली.

108

कोविडमुळे मुंबईतील अनेक भागांमधील विकासाची कामे रखडली आहेत. मात्र, संपूर्ण मुंबईत महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील वरळी भागांमध्येच विकासकामे झपाट्याने केली जात आहे. वरळीतील विकास पाहता मुंबईच्या इतर भागांमधील विकासकामांऐवजी प्रशासनाचा सर्व कल हा जी दक्षिण विभागाकडेच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई म्हणजेच वरळी असे चित्र आज पाहायला मिळत असून वरळीशिवाय अन्य भागांमधील विकासकामांकडे पाहायला प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेळ नसल्याचे दिसून येत आहे.

वरळीतील प्रत्येक विकासकामांना आयुक्तांकडून हिरवा सिग्नल!

परिमंडळ दोनमध्ये एफ उत्तर, एफ दक्षिण व जी उत्तर व जी दक्षिण हे विभाग आहेत. यातील जी दक्षिण विभागात वरळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व पर्यावरणमंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे हे करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वरळी मॉडेल बनवण्याच्या दृष्टीकोनातून नागरी विकासकामांसह सुशोभिकरणावर भर देण्याची घोषणा केली. त्यामुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी वरळीतील विकासकामांचा कोणताही प्रस्ताव आल्यास त्यावर आयुक्तांकडून त्वरीत हिरवा सिग्नल दाखवला जातो.

(हेही वाचा : दरवर्षी नालेसफाई, तरीही मुंबई पाण्याखाली!)

वरळीत ड्रिम मॉडेलचे स्वप्न साकारण्यास महापालिकेचे प्रयत्न

वरळी परिसरात सर्वप्रथम हाय व्हिजिब्लिटी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती, त्यानंतर चौकांमध्ये वाहतूक पट्टयांची रंगरंगोटीसह सुशोभिकरण करणे, तसेच वरळीतील जांभोरी मैदान हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असतानाही मुंबई महापालिकेने याचा विकास करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय सुशोभिकरणाच्या नावाखाली रस्त्यांवरील झोपड्या हटवण्याचे काम सुरु असून यातील काही पात्र झोपड्यांवरही कारवाई केल्याने विभागातील जनता नाराज आहे. विभागात रस्त्यांची सुधारणा, चौकांचे व वाहतूक बेटांचे सुशोभिकरण तसेच पर्जन्य जलवाहिनी, पदपथांची सुधारणा आदींची कामे युध्दपातळीवर हाती घेत विकास केला जात आहे. एका बाजुला अन्य भागांमध्ये कोविडच्या नावाखाली अनेक विकासकामांच्या प्रस्तावांना तातडीने परवानगी दिली जात नाही, तिथे वरळीत प्राधान्याने अशाप्रकारच्या प्रस्तावांच्या परवानगींना विलंब होणार नाही याची विशेष काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. पर्यावरणमंत्री असल्याने त्यांच्या विभागांमध्ये प्रशासन लक्ष देतानाच त्यांच्या वरळी ड्रिम मॉडेलचे स्वप्न साकारण्यास हातभार लावताना दिसत आहे.

(हेही वाचा : एवढी वर्षे मुंबईची सत्ता भोगूनही सेनेची मुंबईकरांशी गद्दारी! आशिष शेलारांचा टोला)

मुंबई महापालिकेच्या तीन उपायुक्तांच्या बदल्या मागील आठवड्यात करण्यात आल्या. यामध्ये लालबाग ते धारावी या परिसरातील परिमंडळ दोनमधील सहायक आयुक्त विजय बालमवार यांची अवघ्या काही दिवसांमध्येच बदली करण्यात आली आहे. बालमवार यांच्या जागी परिमंडळ एकच हर्षद काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांची तक्रार असल्याने बालमवार यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. बालमवार यांची मागील वर्षभरातच दोन वेळा बदली झालेली आहे. त्यामुळे बालमवार यांची भीती नक्की कुणाला वाटते, असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.