चार वर्षांत ७ हजार कोटींची रस्त्यांची कामे, तरीही खड्डे आहेतच!

मुंबईत रस्ते विकास कामांसाठी निविदा काढताना कंत्राटदारांना अधिक किमतीची कामे देण्यासाठी काही अडगळीतील तसेच गल्ल्यांमधील रस्त्यांचा समावेश कंत्राट कामांमध्ये केला गेला आहे.

मुंबईत मागील चार वर्षांपासून रस्ते विकासाची कामे हाती घेतानाच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याऐवजी अशा खड्डयांमुळे वारंवार खराब होणाऱ्या रस्ते विकासाला चालना देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डयांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. या रस्त्यांच्या कामांवर मागील चार वर्षांत सात हजारांहून अधिक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु खड्डे काही मुंबईची पाठ सोडत नसून विभागातील अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांना जास्त रकमेची कामे मिळावी म्हणून खराब रस्त्यांच्याऐवजी गल्लीबोळातील चांगल्या रस्त्यांचाही त्यात समावेश करण्यात येत होता. त्यामुळे अनेक रस्त्यांच्या विकासावरील कोट्यवधी रुपयांच्या खर्चामुळे खड्ड्यांची समस्या कमी होण्याऐवजी दरवर्षी रस्त्यांची कामे केल्यानंतही ती वाढलेलीच पाहायला मिळत आहे.

१९९७पासून २१ हजार कोटींहून अधिक कोटी रुपये खर्च

मुंबईतील रस्ते विकासकामांवर १९९७-९८पासून तब्बल २१ हजार १४३ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती अंधेरी पश्चिम येथील भाजपचे आमदार अमित साटम यांना माहिती अधिकारातून प्राप्त झाली. १९९७पासून २१ हजार कोटींहून अधिक कोटी रुपये खर्च करूनही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साजेसे रस्ते बनवता आलेले नाही. त्यामुळे २४ वर्षांत एकूण २१ हजार कोटी रुपये हे करदात्यांचे खड्डयात घातले आहे. त्यामुळे महापालिकेत भ्रष्टाचार सुरु असून वाझेगिरी करणारे कोण आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे.

(हेही वाचा : ‘कोरोना सुपर स्प्रेडर’ म्हटले म्हणून भारतीय मॅगझिनवर चीनची बंदी!)

कोल्डमिक्स खरेदीला १५० कोटींची मान्यता, खर्च मात्र १२ कोटी

प्रशासनाने दिलेल्या माहितीमध्ये सन २०१७ -१८ ते सन २०२० -२१ या वर्षात ७ हजार कोटींहून अधिक कोटी रुपये खर्च केले आहे. विशेष म्हणजे या चार वर्षांमध्ये खड्डे बुजवण्याच्या कामांना प्राधान्य देण्याऐवजी पावसाळ्यापूर्वी वारंवार खड्डे पडणारे रस्ते निश्चित करून त्यांचा विकास करण्यात आला. या रस्ते विकासाची काम जलदगतीने व्हावे यासाठी डांबराच्या थरावर ओरखडे मारून त्यावर आणखी एक डांबराचा थर चढवत रस्ते बनवण्याचा प्रयोग केला गेला. त्यामुळे मागील चार वर्षांमध्ये खड्डे बुजवण्यावरील खर्च कमी होवून तो रस्ते कामांमध्ये अंतर्भूत झाला. मागील तीन वर्षांपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे १५० कोटींचे कोल्डमिक्स खरेदीला स्थायी समितीने मान्यता दिली होती. परंतु यापैकी केवळ १२ ते १५ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. त्यामुळे रस्त्यांवर पूर्वीप्रमाणे खड्डे नसून जर खड्डे असते तर याचा तंत्राचा वापर केला असता. आणि जर खड्डे आहेत तर या कोल्डमिक्सचा वापर का केला जात नाही, असा सवाल करत खड्डयांबाबत ज्या पक्षाच्या आमदारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे, त्यांनी आपल्या पक्षातील नगरसेवकांना विचारावे की मुंबईत किती खड्डे त्यांना दिसतात, असाही सवाल जाधव यांनी केला आहे.

वर्दळीच्या रस्त्यांच्या विकास राहिला! 

मुंबईत रस्ते विकास कामांसाठी निविदा काढताना कंत्राटदारांना अधिक किमतीची कामे देण्यासाठी काही अडगळीतील तसेच गल्ल्यांमधील रस्त्यांचा समावेश कंत्राट कामांमध्ये केला गेला आहे. त्यामुळे रस्ते विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण ते ज्या रस्त्यांवर खर्च व्हायला पाहिजे होते आणि जे रस्ते घ्यायला हवे होते, त्या रस्त्यांची कामे झालेली नाही. आज वर्दळीच्या रस्त्यांचा समावेश न केल्यामुळे त्यांचा विकास झाला नाही. परिणामी पावसाळ्यात तिथे खड्डे पडून महापालिकेचे नाव कोट्यवधी रुपये खर्च करूनही बदनाम होत असल्याचे महापालिकेच्या काही निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here