२६ जुलैच्या महापुरानंतर ब्रिमस्टोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार २००८मध्ये मुंबईत एकूण आठ ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करणारी उदंचन केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला होता. या आठपैकी हाजी अली, ईला, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड, ब्रिटानिया आणि गझदरबंध ही सहा उदंचन केंद्रांची कामे पूर्ण होवून ती कार्यान्वित झाली आहेत. परंतु मोगरा व माहुल या दोन ठिकाणच्या पर्जन्यजल उदंचन केंद्रांची कामे १२ वर्षांनंतरही बाकी आहेत. आतापर्यंत या पंपिंग स्टेशनच्या उभारणीस वार्षिक देखभालीवर सुमारे एक हजारहून अधिक कोटी रुपये खर्च करण्यात आले तरी त्याचा उपयोग शुन्यच असल्याचे दिसून येत आहे. हिंदमाताच्या ब्रिटानिया पंपिंग स्टेशनवर ११५ कोटी रुपये खर्च केल्यानंतरही पर्जन्य जलवाहिनी आणि याठिकाणी तुंबणारे पाणी अन्य ठिकाणी वळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. त्यामुळे पंपिंग स्टेशनच्या कामांमध्ये कोट्यवधी रुपये मुरत असले तरी पाणी काही मुरत नाही.
सहा पंपिंग स्टेशनच्या उभारणीवर ६६५ कोटी रुपये खर्च!
ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात हाजीअली, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड आणि इर्ला या पंपिगचा तर दुसऱ्या टप्प्यात ब्रिटानिया, मोगरा, माहुलखाडी व गजधरबांध पंपिंग स्टेशनचे काम करण्यात येणार होते. परंतु मोगरा आणि माहुल वगळता सर्व पंपिंग स्टेशन सुरु करण्यात आली आहेत. आतापर्यंत या सहा पंपिंग स्टेशनच्या निव्वळ उभारणीवर ६६५ कोटी रुपये खर्च केले असून नियमित देखभालीसाठी देण्यात आलेल्या कंत्राटाची रक्कम वेगळी.
(हेही वाचा : नदीच्या विकासाची गंगा मैलीच!)
कोट्यवधी खर्चूनही हिंदमाताकडील समस्या जैसे थे!
चार वर्षांपूर्वी हिंदमाता येथे तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ब्रिटानिया पंपिंग स्टेशन सुरु करण्यात आले. या पंपिंग स्टेशनचे लोकार्पण करताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आता हिंदमाताला पाणी भरणार नाही, अशी राणाभीम थाटात घोषणा केली. परंतु त्यानंतरही हिंदमाताला पाणी तुंबण्याचा प्रकार थांबलेला नाही. त्यानंतर पर्जन्य जलवाहिनी बंद झाल्याने हा प्रकार घडत असल्याचे सांगण्यात आले. पण पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आल्यानंतरदेखील ही समस्या कायमच आहे. त्यामुळे पावसामुळे येथील वाहतूक कोंडी होत असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील हिंदमाता उड्डाण पूल व परेल उड्डाणपूल यादरम्यानच्या रस्त्याची उंची १.२ मीटरने वाढविण्याचा निर्णय घेत ते काम पूर्ण केले. या उन्नत मार्गिकेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाच या भागात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी १५ पंप बसवण्यात आले आहेत. यासाठी ३९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. शिवाय या पंपाने पाण्याचा निचरा करण्यासाठी दादर पश्चिम प्रमोद महाजन उद्यान व परेल सेंट झेवियर्स येथे भूमिगत टाक्या उभारुन त्यांना जोडणाऱ्या पर्जन्यजलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. यावरही कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पण हिंदमातातील पाण्याची समस्या काही सुटलेली नाही.
गांधी मार्केट येथील मिनी पंपिंगचे १४ कोटी वाया
मातोश्री परिसरात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ११ कोटी रुपये खर्च करून मिनी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले. त्याच धर्तीवर माटुंगा गांधी मार्केट परिसरातील तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मिनी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले. परंतु हे पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतरही याचा प्रभावीपणे वापर होत नाही. प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे यावर केलेले १४ कोटी रुपये पाण्यातच गेल्याचे दिसून येत आहे.
मोगरा नाला पंपिंग स्टेशन
महापालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात मोगरा नाला पंपिंग स्टेशनचे काम प्रस्तावित केले होते. अंधेरीतील मोगरा नाल्यावर बांधण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनची जागा खासगी असून सीआरझेडमध्ये असल्याने पर्यावरणीय परवानगीअभावी मागील १२ वर्षांपासून काम रखडले आहे. यासाठी महापालिकेने आतापर्यंत जागेची मुल्य म्हणून न्यायालयात ४५ कोटी रुपये भरले आहे. त्यानंतर याबाबतच्या परवानगी आल्यानंतर या पंपिंग स्टेशनच्या बांधकामाकरता निविदा मागवून या जुलै २०२१मध्ये कंत्राटदार निवडीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे १२ ते १३ वर्षांपासून अंधेरी ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपरिसर, मालपा डोंगरी ते वर्सोवा परिसरातील असलेली ही समस्या अजुनही दोन वर्षांहून अधिक राहणार आहे. आता पंपिंग स्टेशन नाल्यातच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात यावर खर्च करण्यात येणाऱ्या ३३० कोटी रुपयांचा किती फायदा होतो हे समजेल.
(हेही वाचा : मुंबईची ‘मिठी’ काही सुटेना!)
माहुल खाडी पंपिंग स्टेशन
माहुल खाडीवर पंपिग स्टेशन बांधण्याचे कामही ब्रिमस्टोवॅड प्रकल्प टप्पा दोनमधील असून मागील बारा ते तेरा वर्षांपासून ते कागदावरच आहेत. ही संपूर्ण जागा मिठागराची असून सरकारची जागा असूनही महापालिकेच्या या पंपिंग स्टेशनसाठी ताब्यात घेण्यास अद्याप यश आलेले नाही. मुंबई महापालिका आयुक्त हे आपत्कालिन व्यवस्थापनाचे प्रमुख आहेत. तरीही त्यांना आपत्कालिन कायद्याचा वापर करून मिठागर आयुक्तांकडून ही जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न करावेसे वाटले नव्हते. आजही बारा ते तेरा वर्षे उलटत आले तरी केवळ सरकारी अडचणींमुळे हे पंपिग स्टेशन रखडले आहे. हे पंपिंग स्टेशन बनल्यास माटुंगा, शीवसह पूर्व उपनगरातील तुंबणाऱ्या पाण्याची बऱ्याच मोठ्या प्रमाणावर समस्या मिटेल.
सहा पंपिंग स्टेशनचे काम
इर्ला पंपिंग स्टेशन
- एकूण पंप : ८
- प्रति सेकंदाला पाणी बाहेर टाकण्याची क्षमता : ४८ हजार लिटर
- एकूण खर्च : ९२ कोटी रुपये
- कोणत्या भागाला फायदा : वर्सोवा, विलेपार्ले
- सुरु झाले: २०१०
वरळी हाजीअली पंपिंग स्टेशन
- एकूण पंप : ६
- प्रति सेकंदाला पाणी बाहेर टाकण्याची क्षमता : ३६ हजार लिटर
- एकूण खर्च : ९९ कोटी रुपये
- कोणत्या भागाला फायदा : नाना चौक, ताडदेव, पेडर रोड
- सुरु झाले: २०१०
क्लीव्ह लँड बंदर पंपिंग स्टेशन
- एकूण पंप : ७
- प्रति सेकंदाला पाणी बाहेर टाकण्याची क्षमता : ४२ हजार लिटर
- एकूण खर्च : ११२ कोटी रुपये
- कोणत्या भागाला फायदा : दादर लोअर परळ, एलफिन्स्टन रोड
- सुरु झाले : वर्ष २०१५
वरळी लव्हग्रुव्ह पंपिंग स्टेशन
- एकूण पंप : १०
- प्रति सेकंदाला पाणी बाहेर टाकण्याची क्षमता : ६० हजार लिटर
- एकूण खर्च : ११६ कोटी रुपये
- कोणत्या भागाला फायदा : चिंचपोकळी, सातरस्ता, भायखळा, जे.जे.मार्ग, करी रोड आणि वरळी
- सुरु झाले : वर्ष २०१५
ब्रिटानिया पंपिंग स्टेशन
- एकूण पंप : ६
- प्रति सेकंदाला पाणी बाहेर टाकण्याची क्षमता : ३६ हजार लिटर
- एकूण खर्च : ११५ कोटी रुपये
- कोणत्या भागाला फायदा : लालबाग, हिंदमाता, काळाचौकी, भायखळा, रे रोड
- सुरु झाले : वर्ष २०१६
(हेही वाचा : भाजप नगरसेवकांना डॅमेज करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न!)
खारदांडा गजधरबांध पंपिंग स्टेशन
- एकूण पंप : ६
- प्रति सेकंदाला पाणी बाहेर टाकण्याची क्षमता : ३६ हजार लिटर
- एकूण खर्च : १३१ कोटी रुपये
- कोणत्या भागाला फायदा : जुहू कोळीवाडा, दौलत नगर, शास्त्री नगर, पी अँड टी कॉलनी, लिंकीग रोड
- सुरु झाले: जून २०१९